संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

शमी पुनरागमनाच्या मार्गावर; गोलंदाजीच्या सरावास प्रारंभ

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी तंदुरुस्त व्हावे, यासाठी तो रणजी स्पर्धेतही खेळणार असल्याचे समजते.

Swapnil S

बंगळुरू : भारताचा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुनरागमनाच्या मार्गावर आहे. रविवारी तसेच सोमवारी शमीने बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गोलंदाजीचा सराव केला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी तंदुरुस्त व्हावे, यासाठी तो रणजी स्पर्धेतही खेळणार असल्याचे समजते.

२०२३मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात शमीने भारतासाठी सर्वाधिक २३ बळी मिळवले होते. मात्र त्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे शमी क्रिकेटपासून दूर आहे. या दरम्यान शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना झाल्यावर शमी बंगळुरूच भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना गोलंदाजी करताना आढळला. यावेळी भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल शमीवर लक्ष ठेवून होता. शमीने शुभमन गिललाही काही मिनिटे गोलंदाजी केली.

“चिन्नास्वामीवर सराव करून मी आनंदी आहे. माझ्या वेदना आता पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. तसेच शरीराची तंदुरुस्ती उत्तम आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी मी रणजी स्पर्धेत खेळणार आहे. मैदानावर अधिकाधिक वेळ घालवण्यास माझे प्राधान्य आहे,” असे शमी म्हणाला. बंगालचे पुढील दोन रणजी सामने केरळ (२६ ऑक्टोबर) व कर्नाटक (६ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध होणार आहेत. त्यामुळे शमी या लढतींसाठी उपलब्ध असेल.

२२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. मात्र शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास त्याला संघात घेण्याची आम्ही जोखीम पत्करणार नाही, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता. त्यामुळे आता शमी पुढील १० ते १५ दिवसांत कशाप्रकारे स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी २४ ऑक्टोबरपासून पुणे, तर तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबई येथे होणार आहे. या लढतींमध्ये भारतीय संघ झोकात पुनरागमन करेल, असेही मत शमीने व्यक्त केले.

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय