बिलासपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईने सलग दुसरा बोनस गुणासह विजय साकारला. ड-गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा एक डाव आणि ९७ धावांनी धुव्वा उडवला. वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीने पाच बळी घेत हिमाचलचा दुसरा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
बिलासपूर येथे झालेल्या या लढतीत सर्फराझ खानच्या १५४ आणि आकाश आनंदच्या ११७ धावांमुळे मुंबईने पहिल्या डावात आठ बाद ५२८ धावांवर डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेशचा पहिला डाव केवळ १४० धावांवर आटोपला, ज्यामुळे मुंबईने पहिल्या डावात ३८८ धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर फॉलोऑन दिलेल्या हिमाचल प्रदेशचा दुसरा डाव बुधवारी ९९.१ षटकांत २९१ धावांवर संपवला. सर्फराझ सामनावीर ठरला.
४४ धावा देत ५ बळी घेणाऱ्या मोहितला तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून उत्तम साथ दिली. याआधी मंगळवारी तिसऱ्या दिवशी खेळ संपल्यानंतर हिमाचल प्रदेशने ३ बाद १४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या दिवशी कर्णधार पुखराज मन्नाने ५० आणि वैभव काल्ताने ६३ धावा करत काही वेळ संघर्ष केला, परंतु मुंबईच्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
या विजयामुळे मुंबईने गुणिकेत पुन्हा पहिले स्थान पटकावले असून त्यांच्या खात्यात दोन सामन्यांतून १४ गुण झाले आहेत. मुंबईने सुरुवातीच्या सामन्यात चंदीगडचा एक डाव आणि १५५ धावांनी पराभव केला होता. आता २६ ऑक्टोबरपासून बीकेसी येथे होणाऱ्या तिसऱ्या लढतीत मुंबईची हरयाणाशी गाठ पडेल.
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. प्रामुख्याने भारताच्या कसोटी संघातील स्थान टिकवण्यासह पुनरागमन करण्यास आतुर असलेल्या तारांकित खेळाडूंच्या कामगिरीकडे या स्पर्धेत विशेष लक्ष असेल. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. बीसीसीआयने जाहीर केलेल्या आदेशानुसार यंदाही वरिष्ठ खेळाडूंना शक्य असेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असेल.
यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. २०२७ मध्ये १७ जानेवारीपासून दुसरा टप्पा सुरू होईल.