कोलकाता : कर्णधार अजिंक्य रहाणेने (१८० चेंडूंत १०८ धावा) साकारलेल्या झुंजार शतकी खेळीला डावखुरा रॉयस्टन डायस (३९ धावांत ५ बळी), सामनावीर शार्दूल ठाकूर (२६ धावांत ३ बळी) या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याची सुरेख साथ लाभली. त्यामुळे मुंबईने मंगळवारी सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबईने उपांत्यपूर्व सामन्यात हरयाणावर चौथ्या दिवशीच १५२ धावांनी वर्चस्व गाजवले.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत मुंबईने दिलेल्या ३५४ धावांचा पाठलाग करताना हरयाणाचा दुसरा डाव ५७.३ षटकांत २०१ धावांत संपुष्टात आला. लक्ष्य दलाल (६४ धावा) आणि सुमित कुमार (६२ धावा) यांनी हरयाणाकडून कडवी झुंज दिली. मात्र रॉयस्टनने प्रथम श्रेणी कारकीर्दीत पहिल्यांदाच पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्याला शार्दूलने ३, तर फिरकीपटू तनुष कोटियनने २ बळी मिळवून उत्तम साथ दिली. त्यामुळे मुंबईने पाचव्या दिवसापर्यंत लढत लांबू न देता मंगळवारीच दणदणीत विजय नोंदवला. पहिल्या डावात ६ बळी घेण्यासह लढतीत एकूण ९ बळी मिळवल्यामुळे शार्दूलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता १७ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या उपांत्य लढतीत मुंबईची विदर्भाशी गाठ पडेल.
अ-गटातून दुसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठणाऱ्या मुंबईने पहिल्या डावात ३१५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हरयाणाचा संघ ३०१ धावांत गारद झाला. त्यामुळे मुंबईला १४ धावांची निसटती आघाडी मिळाली. त्यानंतर सोमवारी तिसऱ्या दिवसअखेर मुंबईने दुसऱ्या डावात ४ बाद २७८ धावांपर्यंत मजल मारली होती. तेथून पुढे चौथ्या दिवसाला प्रारंभ करताना रहाणेने शिवम दुबेच्या साथीने मुंबईला ३०० धावांपलीकडे नेले. रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी साकारताना १३ चौकारांसह यंदाच्या हंगामातील पहिले, तर प्रथम श्रेणी कारकीर्दीतील एकंदर ४१वे शतक झळकावले.
मात्र रहाणेचे शतक झाल्यावर मुंबईचा डाव घसरला. अनुज ठकरालने रहाणेचा अडसर दूर केला. रहाणे व दुबेने पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर ठकरालनेच दुबेलाही ४८ धावांवर बाद केले. त्यानंतर शम्स मुलाणी, कोटियन व शार्दूल हे भरवशाचे त्रिकुट यावेळी अनपेक्षितपणे एकेरी धावातच बाद झाले. शम्सने ५, तर शार्दूल व कोटियनने प्रत्येकी ६ धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा दुसरा डाव ८५.३ षटकांत ३३९ धावांत आटोपला. मुंबईने अखेरचे सहा फलंदाज २५ धावांत गमावले. हरयाणाकडून ठकरालने चार बळी मिळवले. पहिल्या डावातील १४ धावांच्या आघाडीमुळे मुंबईने मग हरयाणासमोर ३५४ धावांचे लक्ष्य ठेवले.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना हरयाणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्दूलने पहिल्या डावातील शतकवीर अंकित कुमारसह (११), हिमांशू राणा (०), रोहित शर्मा (४) यांना झटपट बाद केले. तर रॉयस्टनने यशवर्धन दलाल (३), निशांत सिंधू (५) यांना माघारी पाठवले. ५ बाद ६० अशी स्थिती असताना लक्ष्य आणि सुमित यांनी सहाव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. त्यावेळी सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबेल, असे वाटू लागले. मात्र रॉयस्टनने दडपणाखाली पुन्हा कामगिरी उंचावून सुमितचा (६२) अडसर दूर केला. मग कोटियनने लक्ष्यला (६४) जाळ्यात अडकवले. जयंत यादवने २७ धावांसह झुंज दिली. मात्र दिवसाचा खेळ संपायला १० मिनिटे शिल्लक असताना ५८व्या षटकात रॉयस्टनने जयंतला बाद करून मुंबईच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. हरयाणाचा संघ २०१ धावांत गारद झाला.
आता १७ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या उपांत्य फेरीत मुंबईसमोर विदर्भाचे आव्हान असेल. गतवर्षी मुंबई-विदर्भ यांच्यातच वानखेडेवर रणजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. त्यावेळी मुंबईने बाजी मारली होती. त्यामुळे यंदा विदर्भ मुंबईविरुद्ध वचपा काढणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ३१५
हरयाणा (पहिला डाव) : ३०१
मुंबई (दुसरा डाव) : ८५.३ षटकांत सर्व बाद ३३९ (अजिंक्य रहाणे १०८, सूर्यकुमार यादव ७०; अनुज ठकराल ४/७०)
हरयाणा (दुसरा डाव) : ५७.३ षटकांत सर्व बाद २०१ (लक्ष्य दलाल ६४, सुमित कुमार ६२; रॉयस्टन डायस ५/३९, शार्दूल ठाकूर ३/२६)
सामनावीर : शार्दूल ठाकूर
विदर्भाचीही आगेकूच; आता मुंबईशी गाठ
गतउपविजेत्या विदर्भाने मंगळवारी अन्य उपांत्यपूर्व सामन्यात तमिळनाडूचा १९८ धावांनी धुव्वा उडवला. याबरोबरच विदर्भानेसुद्धा सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता त्यांच्यासमोर मुंबईचे कडवे आव्हान असेल. ही लढत नागपूरमध्येच जामठा येथे होणे अपेक्षित आहे.
उपांत्यपूर्व लढतीत यश राठोडच्या शतकाच्या बळावर विदर्भाने दुसऱ्या डावात २७२ धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर त्यांनी तमिळनाडूसमोर ४०१ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र तमिळनाडूचा संघ मंगळवारी चौथ्या दिवशी ६१.१ षटकांत २०२ धावांत गारद झाला. प्रदोष पॉल (५३) व सोनू यादव (५७) यांनी कडवा प्रतिकार केला. मात्र हर्ष दुबे आणि नचिकेत भुटे यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवून तमिळनाडूला रोखले. पहिल्या डावात शतक साकारणारा करुण नायर सामनावीर ठरला.
गुजरातची सौराष्ट्रवर मात; जॅक्सन निवृत्त
गुजरातने तिसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत सौराष्ट्रला एक डाव आणि ९८ धावांनी नामोहरम केले. सौराष्ट्रला २१६ धावांत गुंडाळल्यावर गुजरातने पहिल्या डावात ५११ धावा केल्या. मग त्यांनी सौराष्ट्रचा दुसरा डाव १९७ धावांत गुंडाळून डावाने विजय नोंदवत थाटात उपांत्य फेरी गाठली. गुजरातसमोर आता जम्मू-काश्मीर किंवा केरळचे आव्हान असेल. जम्मूने केरळला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले असून चौथ्या दिवसअखेर केरळने २ बाद १०० धावा केल्या आहेत. त्यामुळे पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, सौराष्ट्रचा अनुभवी फलंदाज शेल्डन जॅक्सनचा हा कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला. २०११पासून प्रथम श्रेणी खेळत असलेल्या शेल्डनने सौराष्ट्रासाठी २१ शतके झळकावली.