हैदराबाद : अनुभवी अजिंक्य रहाणेने ५४ चेंडूंत ९५ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यानंतर दडपणाखाली सूर्यांश शेडगेने ८ चेंडूंत नाबाद ३० धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत आंध्र प्रदेशला ४ गडी आणि ३ चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह मुंबईने इ-गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली.
राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या इ-गटातील अखेरच्या साखळी लढतीत प्रथम फलंदाजी करताना के. एस. भरतच्या ५३ चेंडूंतील ९३ धावांमुळे आंध्र प्रदेशने २० षटकांत ४ बाद २२९ धावांपर्यंत मजल मारली. तसेच रिकी भूईने ३१ चेंडूंत ६८ धावा फटकावल्या. मात्र २३० धावांचे मोठे आव्हान मुंबईने १९.३ षटकांत गाठले. रहाणेने हंगामातील तिसरे अर्धशतक साकारताना ९ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. त्याला पृथ्वी शॉ (१५ चेंडूंत ३४) आणि शिवम दुबे (१८ चेंडूंत ३४) यांची उत्तम साथ लाभली. मात्र रहाणेसह कर्णधार श्रेयस अय्यर (२५) व सूर्यकुमार यादव (४) असे फलंदाज माघारी परतल्यावर मुंबईला १२ चेंडूंत ३० धावांची गरज होती. त्यावेळी २१ वर्षीय सूर्यांशने पुढाकार घेत ३ षटकार व २ चौकार लगावून मुंबईचा विजय साकारला.
या विजयासह मुंबईने इ-गटात ६ सामन्यांतील ५ विजयांच्या २० गुणांमुळे दुसरे स्थान मिळवले. आंध्र प्रदेशचेसुद्धा ६ सामन्यांत २० गुण आहेत. मात्र मुंबईपेक्षा त्यांची धावगती सरस असल्याने त्यांनी गटात अग्रस्थान मिळवले. ३८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पहिल्या ३ गटांत प्रत्येकी ८ संघ, तर ड आणि इ गटात प्रत्येकी ७ संघांचा समावेश होता. प्रत्येक गटातून आघाडीच्या दोन संघांनी उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. आता उर्वरित ६ संघांसाठी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरील संघांचा आढावा घेण्यात येईल. ९ तारखेपासून बाद फेरी सुरू होईल.
अभिषेकचे २८ चेंडूंत विक्रमी शतक
पंजाबच्या अभिषेक शर्माने २८ चेंडूंत शतक झळकावले. त्याने भारताकडून टी-२० प्रकारात सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या उर्विल पटेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. अभिषेकने अ-गटात मेघालयविरुद्ध २९ चेंडूंत नाबाद १०६ धावा केल्या. गुजरातच्या उर्विलने याच स्पर्धेत काही दिवसांपूर्वी २८ चेंडूंत शतक साकारले होते. इस्टोनियाच्या साहील चौहानच्या नावावर विश्वविक्रम असून त्याने जूनमध्ये सायप्रसविरुद्ध २७ चेंडूंत शतक पूर्ण केले होते.
बडोद्याचा ३४९ धावांचा विश्वविक्रम
बडोद्याने ब-गटात आणखी एका विजयाची नोंद करताना नवा विश्वविक्रम नोंदवला. त्यांनी सिक्कीमविरुद्ध २० षटकांत तब्बल ५ बाद ३४९ धावा कुटल्या. टी-२०मधील ही आजवरची सर्वोत्तम सांघिक धावसंख्या ठरली. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये झिम्बाब्वेने गाम्बियाविरुद्ध ४ बाद ३४४ धावा ठोकल्या होत्या. बडोदाने डावात ३७ षटकार लगावत आणखी एक विक्रमही नोंदवला. त्यांच्यासाठी भानू पनियाने ५१ चेंडूंत नाबाद १३४ धावा केल्या.