ओस्त्रावा : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने मंगळवारी मध्यरात्री ओस्त्रावा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स स्पर्धा २०२५मध्ये विजेतेपद काबिज केले. मात्र सुवर्णानंतरही नीरज त्याच्या कामगिरीबाबत समाधानी नाही. नीरजने ८५.२९ मीटरच्या भालाफेकीसह स्पर्धेत अग्रस्थान पटकावले.
२७ वर्षीय नीरजचे हे यंदाच्या हंगामातील तसेच आठवडाभरातील दुसरे जेतेपद आहे. शनिवारीच त्याने पॅरिस येथील डायमंड लीगच्या टप्प्यात ८८.१६ मीटर अंतरासह अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती. तर त्यापूर्वी मे महिन्यात दोहा येथे झालेल्या डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात नीरजने ९०.२३ मीटरचे अंतर सर केले होते. मात्र त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. आता पॅरिस आणि ओस्त्रावा येथील स्पर्धांमध्ये दोहाच्या तुलनेत कमी अंतरावर भालाफेक करून नीरजने अग्रस्थान पटकावले. मात्र आपल्या या कामगिरीबाबत तो स्वत:च समाधानी नाही.
“मला जी ट्रॉफी जेतेपदासाठी देण्यात आली, त्यासाठी मी नक्कीच आनंदी आहे. कारण बालपणापासून एक दिवस या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून ही ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न होते. माझे प्रशिक्षक जॅन झेलेझ्नी, धावपटू उसेन बोल्ट यांसारख्या दिग्गजांनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवले होते. माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान आहे, मात्र कामगिरीबाबत मी फारसा आनंदी नाही,” असे नीरज म्हणाला.
“मात्र मी ज्याप्रकारे भालाफेक केली, ती अत्यंत निराशाजनक होती. स्पर्धा इतकी वाढली आहे की ८५ मीटरच्या भालाफेकीसह मला ऑलिम्पिक स्पर्धेत आता कांस्यपदकही मिळेल की नाही, याविषयी साशंका आहे. तसेच गेल्या महिन्यात ९० मीटरचे अंतर सर कापल्यावर मला आठवडाभरातील दोन्ही स्पर्धांमध्ये एकदाही ९० मीटरपुढे भालाफेक करता आली नाही. त्यामुळे माझ्या प्रशिक्षकांना मी निराश केले आहे. लवकरच यावर पुन्हा मेहनत करून जुलै महिन्यातील आव्हानांसाठी सज्ज होईन,” असेही नीरजने सांगितले.
२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, तर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा नीरज यंदा प्रथमच गोल्डन स्पाइक स्पर्धेत सहभागी झाला होता. २०२३ व २०२४मध्ये दुखापतीमुळे नीरजला या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. नीरजचे प्रशिक्षक झेलेझ्नी यांनी खेळाडू म्हणून तब्बल ९ वेळा गोल्डन स्पाइक स्पर्धा जिंकलेली आहे.
दरम्यान, नीरजने या स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात फाऊल केला. मग दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८३.४५ मीटर अंतर सर केले. तिसऱ्या प्रयत्नात ८५.२९ मीटर भालाफेक करून नीरजने आघाडी घेतली. हीच त्याच्या विजयासाठी पुरेशी ठरली. त्यानंतर नीरजने अनुक्रमे ८२.१७ मीटर व ८१.०१ मीटर भालाफेक केली, तर सहावा प्रयत्न फाऊल ठरला. नऊ जणांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या स्मिथने ८४.१२ मीटरसह दुसरे स्थान मिळवले, तर ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स ८३.६३ मीटर अंतरासह तिसऱ्या स्थानी राहिला. जर्मनीचा जुलियन वेबर आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.
आता ‘नीरज चोप्रा क्लासिक’वर लक्ष
नीरज चोप्रा हे नाव आता जगभरात ब्रँड झाले आहे, यात शंका नाही. त्यामुळेच नीरजच्या नावाने आयोजित करण्यात येणारी पहिलीवहिली ‘नीरज चोप्रा क्लासिक’ भालाफेक स्पर्धा ५ जुलै रोजी बंगळुरूत रंगणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा नदीम सहभागी नसेल. मात्र वेबर, २०१६चा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता थॉमस रोहलर, जागतिक विजेता अँडरसन पीटर्स असे तारांकित भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. तसेच नीरजसह भारताचे किशोर जेना, रोहित यादव, सचिन यादव हेसुद्धा स्पर्धेत दिसतील. भारताचे भालाफेकीतील वर्चस्व दाखवून देण्यासाठी प्रथमच जागतिक पातळीवरील अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
मला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या अपेक्षेनुसार मी खेळ केला नाही, असे वाटते. जेतेपद मिळवले असले तरी माझी कामगिरी निराशाजनक होती. मला आता सातत्याने ९० मीटर किंवा त्याजवळील अंतरावर भालाफेक करणे गरजेचे आहे. ऑलिम्पिकमध्ये आता ८५ मीटरसह कांस्यपदक जिंकण्याचीही खात्री देता येत नाही. यापुढील स्पर्धांमध्ये कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करेन.नीरज चोप्रा