क्रीडा

गोलंदाजी केली तरच, हार्दिक टी-२० विश्वचषक खेळणार! रोहित, द्रविड, आगरकर यांच्यातील बैठकीत निर्णय

बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत रोहित, द्रविड व आगरकर यांनी टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संभाव्य २५ खेळाडूंची चर्चा केली. त्यामध्ये हार्दिकचा समावेश असला तरी मुख्य १५ खेळाडूंमध्ये त्यांचे स्थान अद्याप पक्के नसल्याचे समजते.

Swapnil S

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषकासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याला भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी करणे गरजेचे आहे. तो उर्वरित आयपीएलमध्ये किती गोलंदाजी करून लय मिळवतो तसेच स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करतो, यावरच हार्दिकविषयी निर्णय घेण्यात येईल. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यातील बैठकीत हार्दिकविषयी चर्चा झाल्याचे समजते.

३० वर्षीय हार्दिकने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मुंबईसाठी सहापैकी चार सामन्यांत गोलंदाजी केली. त्याने या लढतींमध्ये तीन बळी मिळवले आहेत. मात्र १२च्या सरासरीने धावाही लुटल्या. चारपैकी फक्त एका लढतीत म्हणजेच हैदराबादविरुद्ध हार्दिकने चार षटके पूर्ण टाकताना ४६ धावा दिल्या. चेन्नई व गुजरातविरुद्ध त्याने प्रत्येकी तीन षटके, तर दिल्लीविरुद्ध एक षटक गोलंदाजी केली. राजस्थान व दिल्लीविरुद्ध हार्दिकने गोलंदाजी केली नाही.

बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत रोहित, द्रविड व आगरकर यांनी टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संभाव्य २५ खेळाडूंची चर्चा केली. त्यामध्ये हार्दिकचा समावेश असला तरी मुख्य १५ खेळाडूंमध्ये त्यांचे स्थान अद्याप पक्के नसल्याचे समजते. ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकात हार्दिक जायबंदी झाला होता, त्यानंतर थेट आयपीएलद्वारे त्याने पुनरागमन केले. भारताकडे असंख्य फलंदाजांचा पर्याय असल्याने हार्दिकने गोलंदाजीद्वारे अष्टपैलुत्त्व सिद्ध केले, तरच तो १५ जणांत असेल, असे समजते. २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार आहे.

दुबे-रिंकू, यशस्वी-गिल यांच्यापैकी कुणाला संधी?

निवड समितीने सध्या १० खेळाडूंची नावे टी-२० विश्वचषकासाठी पक्की केली असल्याचे समजते. मात्र उर्वरित ५ खेळाडूंसाठी असंख्य खेळाडूंमध्ये संघर्ष सुरू आहे. टी-२० विश्वचषकासाठी प्रत्येकी संघाला १ मेपर्यंत १५ खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत. मग २५ मेपर्यंत त्यांना १५ खेळाडूंमध्ये बदल करण्याची मुभा आहे.

सध्याच्या माहितीनुसार विराट व रोहित टी-२० विश्वचषकात सलामीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुभमन गिल व यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. जर विराट तिसऱ्या क्रमांकावर आल्यास शिवम दुबे किंवा रिंकू सिंग यांच्यापैकी एकाला संघात संधी मिळू शकेल. त्यामुळे विराट आगामी टी-२० विश्वचषकात सलामीला येईल, असे समजते. रोहित, विराट, सूर्यकुमार, पंत/सॅमसन, दुबे/रिंकू, हार्दिक, जडेजा, कुलदीप, बुमरा, सिराज, अर्शदीप हे संभाव्य ११ खेळाडू भारताच्या पहिल्या पसंतीच्या संघात खेळताना पाहायला मिळू शकतात.

हे १० खेळाडू जवळपास पक्के

रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवी बिश्नोई.

५ जागांसाठी यांच्यात झुंज

हार्दिक पंड्या, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शुभमन गिल, संजू सॅमसन, जितेश शर्मा, के. एल. राहुल, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, मयांक यादव, आवेश खान, रियान पराग, टी. नटराजन.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत