चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी (दि.२३) दुबईतील मैदानात भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या सामन्याची संपूर्ण क्रिकेटविश्व वाट बघत आहे. तथापि, या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका बसलाय. पाकिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याला मुकणार आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, दुखापतीमुळे केवळ भारताविरुद्धच्या सामन्यातूनच नव्हे तर फखर जमानला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर व्हावे लागलेय.
बुधवारी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानला न्यूझीलंडच्या संघाने ६० धावांनी धूळ चारली. या सामन्यात फखर जमान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. चेंडू सीमारेषेकडे जाण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात त्याला दुखापत झाली आणि मैदान सोडावे लागले. नंतर बराच वेळाने क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरला, पण त्यामुळे दंड म्हणून फलंदाजी करताना त्याला २० मिनिटे उशीरा यावे लागले. परिणामी तो सलामीला येऊ शकला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हाही तो पूर्ण फिट दिसत नव्हता. अखेर आता दुखापतीमुळे फखर जमान या संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर गेल्याचे वृत्त आले आहे. त्याच्याजागी सलामीवीर इमाम-उल-हक याची वर्णी संघात लागली आहे. आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.
(बातमी अपडेट होत आहे)