क्रीडा

Paralympic Games Paris 2024: पदकांचा षटकार अन् दशकपूर्तीही साकार! नितेशचा गोल्डन स्मॅश

Swapnil S

पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सोमवारच्या पाचव्या दिवशी भारताने पदकांचा षटकार लगावतानाच दशकपूर्तीही साकारली. बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारने ऐतिहासिक सुवर्णपदक काबिज केले. तसेच थुलासिमती मुरुगेसनने रौप्य, तर मनीषा रामदासने कांस्यपदकावर नाव कोरले. त्याशिवाय उंच उडीत निशाद कुमार, तर थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाने रौप्यपदक प्राप्त केले. धावण्याच्या शर्यतीत प्रीती पालने पुन्हा एकदा कांस्यपदक पटकावले. त्यामुळे आता २ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कांस्य अशा एकूण ११ पदकांसह भारताने पदकतालिकेत २२व्या स्थानी झेप घेतली आहे.

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सोमवारच्या पाचव्या दिवशी भारताने बॅडमिंटनमध्ये तिहेरी यश संपादन केले. नितेश कुमारने पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याशिवाय महिलांमध्ये थुलासिमती मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाला गवसणी घातली.

२९ वर्षीय नितेशने भारतासाठी यंदाच्या पॅरालिम्पिकमधील दुसरे सुवर्ण जिंकले. त्याने पुरुष एकेरीत एसएल ३ प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलला २१-१४, १८-२१, २३-२१ असे तीन गेममध्ये नमवले. हरयाणाच्या नितेशचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले. एसएल ३ प्रकारात कंबरेखालील भागापासून अपंगत्व आलेले खेळाडू सहभागी होतात. १५ वर्षांचा असताना रेल्वे अपघातात नितेशला डावा पाय गमवावा लागला.

महिला एकेरीतील एसयू ५ प्रकारात थुलासिमती आणि मनीषा उपांत्य फेरीत एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्या. त्यामध्ये थुलासिमतीने बाजी मारली. मात्र अंतिम फेरीत तिला चीनच्या गतविजेत्या यांग क्विनाकडून १७-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे थुलासिमतीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या लढतीत मनीषाने डेन्मार्कच्या कॅथरिन रोझला २१-१२, २१-८ अशी धूळ चारली. या दोघींच्या यशामुळे भारताची या स्पर्धेतील बॅडमिंटनमधील पदकांची संख्या ३ झाली आहे.

मिश्र दुहेरीतील अन्य लढतींमध्ये भारताच्या शिवाराजन व निथुआ शिवन यांना अपयश आले. त्यांना इंडोनेशियन जोडीने २१-१७, २१-१२ असे पराभूत केले.

> सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने बॅडमिंटनच्या एसएल ३ प्रकारात सुवर्णपदक जिंकले. २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये प्रमोद भगतने, तर यंदा नितेशने अशी कामगिरी नोंदवली.

पदक घेण्यासाठी पोडियमवर उभे राहिल्यावर मला अश्रू अनावर झाले. भारताचे राष्ट्रगीत ऐकण्याचा क्षण मी कधीही विसरणार नाही.

- नितेश कुमार

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा