Twitter
क्रीडा

Paris 2024 Olympics: दुहेरीतही भारताचा अचूक निशाणा! ऐतिहासिक पदकामुळे मनू-सरबजोतचे देशभरात कौतुक

Swapnil S

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नेमबाजांनी पुन्हा त्यांचे वर्चस्व सिद्ध केले. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घालताना दक्षिण कोरियाच्या जोडीवर मात केली. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये प्रथमच एखाद्या जोडीने नेमबाजीत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे या दोघांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मनूने रविवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक काबिज केले होते, तर पुरुषांच्या याच प्रकारात सरबजोतला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र सरबजोतने मनूच्या साथीने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. चेटेरॉक्स येथील राष्ट्रीय नेमबाजी केंद्रात झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत मनू आणि २२ वर्षीय सरबजोत यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओ ये जिन या जोडीवर १६-१० असे वर्चस्व गाजवले.

“मी आणखी एका प्रकारात सहभागी होणार आहे. त्यामुळे तेथेही पदक जिंकण्याचेच माझे ध्येय असेल. मात्र चुकून अपयश आलेच, तर देशवासी नाराज होणार नाहीत अथवा माझ्यावर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे,” असे मनू म्हणाली. “ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणे स्वप्नवत आहे. मी याविषयी सातत्याने विचार करत होते. त्यामुळे हा दिवस कायम स्मरणात राहील,” असेही तिने पदक जिंकल्यानंतर सांगितले.

दुसरीकडे कारकीर्दीतील पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या सरबजोतनेसुद्धा चाहते आणि प्रशिक्षकांचे आभार मानले. “तीन दिवसांपूर्वी ऑलिम्पिकच्या एकेरीत अंतिम फेरी न गाठल्याने मी निराश होतो. मात्र या यशामुळे समाधान लाभले. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो,” असे सरबजोत म्हणाला.

नेमबाजांनी पुन्हा भारतीयांचा मान अभिमानाने उंचावली. मनूने सातत्यपूर्ण कामगिरीसह दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातली. मनू आणि सरबजोत यांचे अभिनंदन. तुमच्या यशाचा आनंद संपूर्ण देशात साजरा केला जात आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मनू आणि सरबजोत यांचे ऑलिम्पिक कांस्यपदकाबद्दल हार्दिक अभिनंदन. मनूने इतिहास रचताना अवघ्या दोन दिवसांतच दुहेरी पदकांची कमाई केली. तिला व सरबजोतला भविष्यातील यशासाठी शुभेच्छा.
- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा