बँकॉक : भारताची तारांकित खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी गुरुवारी आपापल्या सामन्यात सरळ गेममध्ये विजय मिळवत ५,००,००० डॉलर बक्षीस रकमेच्या थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि सहावी मानांकित सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या अमाली शुल्झचा २१-१३, २१-१५ असा अवघ्या २८ मिनिटांत पराभव केला. पुरुष एकेरीत सातव्या मानांकित आणि २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या लक्ष्य सेनने चीनच्या झू झुआन चेनवर २१-१२, २१-१३ अशी ३९ मिनिटांत मात केली.
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीशी होईल. लक्ष्य सेनसमोर थायलंडच्या दुसऱ्या मानांकित कुनलावुत वितिदसर्णचे आव्हान असेल. भारताच्या अव्वल मानांकित सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीनेही मलेशियाच्या ब्रायन जेरेमी गुंटिंग आणि मोहम्मद हैकल यांचा २१-१२, २१-१९ असा ४४ मिनिटांत पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या या भारतीय जोडीची पुढील लढत जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युइची शिमोगामी या सहाव्या मानांकित जोडीशी होईल.
दुसरीकडे, भारताचा माजी अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या अटीतटीच्या सामन्यात चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत ४७ व्या स्थानावर असलेल्या सु ली यांगकडून १६-२१, २१-११, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. एक तास आणि १० मिनिटे चाललेल्या या संघर्षपूर्ण लढतीनंतर श्रीकांतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला थायलंड मास्टर्स ही पहिली सुपर ३०० स्पर्धा जिंकणाऱ्या युवा देविका सिहागचेही आव्हान संपले असून, तिला थायलंडच्या पिच्चामॉन ओपातनिपुथकडून २१-२३, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्य सेनने चेनविरुद्धच्या सामन्यात ६-२ अशी दमदार सुरुवात केली होती, परंतु चिनी खेळाडूने ११-११ अशी बरोबरी साधली. त्यानंतर लक्ष्यने सलग सहा गुण घेत पहिल्या गेमवर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने मध्यंतरापर्यंत ११-५ अशी आघाडी घेतली आणि चेनच्या चुकांचा फायदा उठवत त्याला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. आता सिंधू, लक्ष्यवर सर्वांचे लक्ष असेल.