ब्रिस्बेन : भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी धक्कादायकरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेली १५ वर्षे भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करणाऱ्या अश्विनने वयाच्या ३८व्या वर्षी अलविदा केला. आता तो आयपीएल आणि अन्य देशांच्या लीगमध्ये खेळताना दिसेल. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अश्विनचा अनिल कुंबळेनंतर दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळेच भारताच्या महान कसोटी क्रिकेटपटूंमध्ये त्याचीही गणना केली जाईल, हे निश्चित.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. या लढतीनंतर ड्रेसिंग रूममध्ये कॅमेरा मारल्यावर विराट कोहली अश्विनला आलिंगन देताना दिसून आला. त्यावेळीच काहीतरी धक्कादायक बातमी समोर येणार, असे वाटले. अखेर अश्विननेच कर्णधार रोहित शर्मासह पत्रकार परिषदेत येत निवृत्तीची घोषणा केली. नोव्हेंबर २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या अश्विनने काही दिवसांपूर्वी अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना खेळला. असंख्य चाहत्यांची अश्विनने मैदानात सामना खेळून निवृत्ती पत्करावी, अशी इच्छा होती. मात्र अश्विनने वाढते वय आणि भविष्याचा विचार करता आताच थांबण्याचा निर्णय घेतला.
“भारतीय संघाचा क्रिकेटपटू म्हणून माझा आजचा शेवटचा दिवस होता. माझ्यात अजूनही काहीसे क्रिकेट नक्कीच शिल्लक आहे. मात्र आता मी क्लबस्तरीय व अन्य लीगमध्ये माझ्यातील क्रिकेट दाखवेन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याची हीच वेळ आहे,” असे अश्विन म्हणाला. रोहितनेही त्यानंतर खुलासा करताना सांगितले की अश्विन पहिल्या कसोटीनंतरच निवृत्ती जाहीर करण्याच्या विचारात होता. मात्र संघ व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून त्याने निर्णय लांबवला.
जून २०१०मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळून अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तो २०११च्या विश्वचषक विजेत्या तसेच २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. मात्र अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांची जोडी निवृत्ती झाल्यावर अश्विनने रवींद्र जडेजाच्या साथीने गेली १२ ते १३ वर्षे समर्थपणे फिरकीची धुरा वाहिली. अश्विनच्या जोरावर भारताने मायदेशात १२ वर्षांत एकही कसोटी मालिका गमावली नाही, असे ठामपणे सांगू शकतो. गरज पडल्यास फलंदाजीतही त्याने योगदान दिले. शतके झळकावून सामने वाचवले. त्यामुळेच कसोटीत त्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते.
१०६ कसोटींमध्ये अश्विनने ५३७ बळी मिळवले. भारतासाठी फक्त कुंबळेने अश्विनपेक्षा अधिक म्हणजेच ६१९ बळी मिळवले होते. सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अश्विन सातव्या स्थानी आहे. तसेच फलंदाजीत ६ शतकांसह ३,५०३ धावाही केल्या. एकदिवसीय प्रकारात अश्विनने ११६ सामन्यांत १५६, तर टी-२०मध्ये ६५ लढतींमध्ये ७२ बळी मिळवले. आयपीएलमध्ये अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचे प्रतिनिधित्व केले. एकेकाळी अश्विनला महेंद्रसिंह धोनीचा हुकमी एक्का मानले जायचे. त्यामुळेच आता आयपीएल २०२५मध्ये पुन्हा चेन्नईत धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळताना चाहत्यांना अश्विनचा खेळ पाहता येईल.
अश्विनला माजी क्रिकेटपटूंकडून मानवंदना
अश्विनने त्याच्या निवृत्तीच्या भाषणात रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा या खेळाडूंचे आभार मानले. त्याच्या निवृत्तीनंतर समाज माध्यमांवर सर्वांनी आपापली मते व्यक्त केली. तसेच रहाणेला शुभेच्छा दिल्या.
“क्रिकेट मैदानावर फलंदाजीत योगदान देण्यासह कॅरम बॉलवर फलंदाजांना चकवण्यात तुझा हात कोणीही धरू शकत नाही. तुझ्या कारकीर्दीमुळे असंख्य खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा,” असे सचिन तेंडुलकरने ट्वीट केले.
त्याशिवाय रोहितने पत्रकार परिषदेत अश्विनचे महत्त्व अधोरेखित केले. “गेल्या १२-१३ वर्षांपासून अश्विन भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याची उणीव नक्कीस भासेल. अश्विनने भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. एक सहकारी तसेच मित्र म्हणून तो नेहमीच माझ्यासाठी खास असेल,” असे रोहित म्हणाला.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी तसेच आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी अश्विनला शुभेच्छा दिल्या.
अश्विन खास का?
तमिळनाडूच्या सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या अश्विनने इंजिनिअरिंगच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करून क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासारखा स्पष्टवक्तेपणा तसेच चाणाक्ष वृत्ती भारतीय संघातील अन्य खेळाडूत क्वचितच दिसून येईल.
कॅरम बॉल, दुसरा, गुगली, टॉप स्पिन अशी विविध अस्त्रे भात्यात असलेल्या अश्विनची गोलंदाजी शैलीही मजेशीर होती. फेब्रुवारीत कारकीर्दीच्या ९८व्या सामन्यात अश्विनने ५०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. तेव्हाही अश्विनने आपल्याला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे, असे सांगितले होते.
क्रिकेटशी निगडीत कोणताही वादग्रस्त नियम अथवा गोलंदाजांवर होणारा अन्याय याविरोधात अश्विनने आवाज उठवला. त्याच्या मंकडिंग प्रकरणाची चर्चा आजही होते. २०१६मध्ये अश्विनला आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरवले.
जगभरात कुठे काय घडते, यावर अश्विनचे बारीक लक्ष. २०२३च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्थान न मिळूनही अश्विन त्याच्या कार्याशी एकनिष्ठ राहिला. कसोटीत ३,००० धावा आणि ५०० बळी अशी कामिगरी करणारा तो भारताचा एकमेव खेळाडू आहे.