रायपूर : गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर बलाढ्य मुंबईला छत्तीसगढविरुद्धच्या रणजी सामन्यात कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. मुंबईने पहिल्या डावात उभारलेल्या ३५१ धावांना उत्तर देताना, छत्तीसगढने अमनदीप खरेच्या शतकी खेळीमुळे ३५० धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबईला एका धावेची का होईना, पण महत्त्वपूर्ण आघाडी घेता आली. मुंबईने आता तिसऱ्या दिवसअखेर १ बळी गमावत ९७ धावा केल्या आहेत.
छत्तीसगढने दुसऱ्या दिवसाच्या ४ बाद १८० धावसंख्येवरून खेळाला सुरुवात केली. मात्र एकनाथ केरकरच्या (१८) रूपाने त्यांना पाचवा धक्का बसला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांसह अमनदीपने छत्तीसगढच्या डावाची उभारणी केली. त्याने आक्रमक फटकेबाजी करत १४ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. त्याला तळाच्या अजय मंडल (२१), शुभम सिंग (५), रवी किरण (९) आणि आशिष चौहान (५) यांची साथ लाभली. मुंबईकडून तुषार देशपांडेने ५ तर रॉयस्टन डायस आणि शम्स मुलाणी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले.
अमनदीपने संधी मिळताच, मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने २११ चेंडूंत १४३ धावांची खेळी केली. मात्र वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने शेवटच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत छत्तीसगढचा डाव १०६.१ षटकांत ३५० धावांवर संपुष्टात आणला.
मुंबईने दुसऱ्या डावातही आश्वासक सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी या पहिल्या डावातील शतकवीरांनी सलामीसाठी ७८ धावांची भर घातली. पृथ्वी (४५) धावांवर माघारी परतला तरी भूपेन ललवानी ४० तर अमोघ भटकळ ६ धावांवर खेळत आहेत.