सुरत : मेघालयच्या आकाश कुमार चौधरीने रविवारी सलग ८ षटकार मारत दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग ८ षटकार मारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत अवघ्या ११ चेंडूंत अर्धशतक झळकावून सर्वात जलद अर्धशतकाचाही विक्रम त्याने आपल्या नावे केला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध गटातील लढतीत त्याने हा विक्रम केला.
२५ वर्षीय चौधरीने हा पराक्रम सूरतमधील पिठावाला मैदानावर केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ही विक्रमी कामगिरी केली. त्याने १४ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या. मेघालयने पहिली डाव ६ बाद ६२८ धावांवर घोषित केला.
याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या लीसेस्टरशायर संघातील वेन व्हाइटने २०१२ मध्ये एसेक्सविरुद्ध खेळताना १२ चेंडूंत अर्धशतकीय बॅट उंचावली. मात्र त्याचा हा विक्रम चौधरीने मोडला. तसेच, चौधरी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग सहा षटकार मारणारा चौधरी हा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम वेस्ट इंडीजच्या सर गारफिल्ड सोबर्स आणि भारताच्या रवी शास्त्री यांनी केला होता.
मेघालयचा संघ ६ बाद ५७६ धावांवर असताना चौधरी फलंदाजीला आला. त्याने एक चेंडू निर्धाव आणि दोन चेंडूंत एकेरी धावाने डावाची सुरुवात केल्यानंतर पुढील आठ चेंडूंवर सलग आठ षटकार ठोकले. अरुणाचलचा गोलंदाज लिमार डाबीच्या गोलंदाजीवर त्याने प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर फेकला.
रविवारच्या सामन्यापूर्वी चौधरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४.३७ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. ३० सामन्यांमध्ये त्याने केवळ दोन अर्धशतके झळकावली होती.
मेघालयच्या ६ बाद ६२८ धावांच्या प्रत्युत्तरात अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव केवळ ७३ धावांत आटोपला. फॉलोऑन घेतल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांची अवस्था ३ बाद २९ अशी झाली आहे. त्यामुळे ते अजूनही ५२६ धावांनी पिछाडीवर आहेत.
श्रेयस गोपालची चमकदार कामगिरी
नाशिक : महाराष्ट्राचा फलंदाज पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावले. पण श्रेयस गोपालच्या अष्टपैलू कामगिरीमुळे रविवारी रणजी ट्रॉफी गट ‘बी’ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटकने आघाडी घेतली.
२५७ धावांवर पाच बाद अशा स्थितीतून दिवसाची सुरुवात करताना, गोपालने १६२ चेंडूंत ७१ धावा करत कर्नाटकचा पहिला डाव ३१३ धावांवर नेला. कर्णधार मयंक अग्रवालने डावाच्या सुरुवातीला ८० धावा केल्या.
त्यानंतर फिरकीपटू गोपालने चार बळी घेतले. दिवसअखेर महाराष्ट्राचा डाव ६ बाद २०० वर थांबला. त्यामुळे ते कर्नाटकच्या धावसंख्येपेक्षा ११३ धावांनी पिछाडीवर आहेत. हंगामाच्या सुरुवातीला द्विशतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉने महाराष्ट्राकडून प्रतिकार केला. पण अखेरीस मोसिन खानच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. जलज सक्सेना ३४ आणि विकी ओस्तवाल ४ धावांवर नाबाद होते.