नागपूर : एकेकाळी विदर्भाकडून खेळणारा आदित्य सरवटे (१२० चेंडूंत नाबाद ६६ धावा) आता त्याच संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. केरळकडून खेळणारा डावखुरा फिरकीपटू आदित्यने फलंदाजीत बढती मिळाल्याचा लाभ उचलून झुंजार अर्धशतक झळकावले. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात केरळने विदर्भाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूर, जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर केरळने ३९ षटकांत ३ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली आहे. केरळ पहिल्या डावात अद्याप २४८ धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेर आदित्य ६६, तर कर्णधार सचिन बेबी ७ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे शुक्रवारी तिसऱ्या दिवशी केरळचा संघ पहिल्या डावात आघाडी घेण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या रणजी स्पर्धेचा ९०वा हंगाम आता अंतिम लढतीच्या टप्प्यात आहे. एकीकडे विदर्भाला तिसऱ्यांदा, तर केरळला प्रथमच विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने उपांत्य फेरीत मुंबईला धूळ चारून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे यंदा घरच्या मैदानात जेतेपद मिळवण्याचे विदर्भाचे लक्ष्य असेल. विदर्भाने यापूर्वी २०१७-१८, २०१८-१९ या हंगामांत रणजी स्पर्धा जिंकली होती. दुसरीकडे केरळने उपांत्य फेरीत गुजरातला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर नमवून प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित असल्याने विजेता कोण ठरणार, याकडे लक्ष लागून आहे.
तत्पूर्वी, बुधवारी पहिल्या दिवसअखेर विदर्भाने दानिश मलेवारच्या शतकाच्या बळावर ४ बाद २५४ धावा केल्या होत्या. तेथून पुढे गुरुवारी दुसऱ्या दिवशी विदर्भाचा पहिला डाव १२३.१ षटकांत ३७९ धावांत आटोपला. दानिश व यश ठाकूर यांनी सावध सुरुवात केली. मात्र दिवसाच्या १०व्या षटकात दानिश दीडशतक साकारून बसिलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १५ चौकार व ३ षटकार लगावले. त्यानंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा यश राठोड (३), कर्णधार वाडकर (२३) यांनी निराशा केली. त्यामुळे विदर्भाची घसरगुंडी उडाली. ११व्या क्रमांकावरील नचिकेत भुटेने ३८ चेंडूंत ३२ धावांचे योगदान देत विदर्भाला ३५० धावांपलीकडे नेले. केरळसाठी एडन टॉम व एमडी निधीश यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात केरळच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. रोहन कुन्नुमल (०) व अक्षय चंद्रन (१४) या सलामीवीरांना वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेने ३ षटकांतच माघारी पाठवले. त्यानंतर सहाव्या अथवा सातव्या स्थानी फलंदाजी करणाऱ्या ३५ वर्षीय आदित्यला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्याने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील १३वे अर्धशतक झळकावताना १० चौकार लगावले. तसेच अहमद इम्रानसह तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची उपयुक्त भागीदारी रचली. यश ठाकूरने अहमदचा ३७ धावांवर अडसर दूर केला. आदित्य व सचिनने मग आणखी पडझड होऊ न देता केरळला दिवसअखेर १३१ धावांपर्यंत पोहोचवले.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ (पहिला डाव) : १२३.१ षटकांत सर्व बाद ३७९ (दानिश मलेवार १५३, करुण नायर ८६; एमडी निधीश ३/६१)
केरळ (पहिला डाव) : ३९ षटकांत ३ बाद १३१ (आदित्य सरवटे नाबाद ६६, अहमद इम्रान ३७; दर्शन नळकांडे २/२२)