क्रीडा

लवकरच मैदानात परतण्याचा रवींद्र जडेजाचा निर्धार

वृत्तसंस्था

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. लवकरात लवकर मैदानात परतण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

जडेजाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. बीसीसीआय, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, डॉक्टर आणि चाहते यांनी मला सहकार्य केले. त्यांचे मी आभार मानतो. मी लवकरच माझा सराव पुन्हा सुरू करेन आणि लवकरात लवकर क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.’ जडेजा बऱ्याच काळापासून गुडघ्याच्या समस्येशी समना करत आहे. आयपीएल २०२२ दरम्यान रवींद्र जडेजाला ही दुखापत झाली होती. यामुळेच त्याला काही सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर जडेजाने इंग्लंड दौऱ्यातून मैदानात पुनरागमन केले. तेव्हापासून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याचे संघाबाहेर होणे टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे.

आशिया चषक २०२२ मधील ‘सुपर ४’च्या सामन्यांपूर्वीच भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गंभीर दुखापतींमुळे स्पर्धेबाहेर पडला. यासंदर्भात बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली होती. यानंतर त्याच्या जागी अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले. आशिया चषकात रवींद्र जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन षट्कांत अवघ्या ११ धावा दिल्या आणि ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने हार्दिक पंड्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला तारून विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचविले होते. या सामन्यात त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही जडेजाने चार षट्कात केवळ १५ धावा देत एक विकेट घेतली होती.

टी-२० विश्वचषकात खेळण्याची शक्यता धूसर; आशा कायम

शस्त्रक्रियेनंतर जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यास अधिक कालावधी लागण्याचीही शक्यता आहे. तथापि, प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मते, जडेजाला आतापासूनच टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर समजणे योग्य ठरणार नाही. या स्पर्धेला अजून बराच कालावधी आहे. तो तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असून त्याच्या तब्येतीबाबत ठोस माहिती मिळत नाही, तोपर्यंत याबद्दल कोणतेही भाष्य करणे योग्य नाही.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस