क्रीडा

रवींद्र जडेजाचे वडील म्हणाले- 'आता त्याच्याशी संबंध नाही : त्याला क्रिकेटर बनवले नसते तर बरे झाले असते, सूनेला फक्त पैसा पाहिजे '

Swapnil S

"तुम्हाला खरं सांगायचं तर, सध्या माझा रवी किंवा त्याची पत्नी रिवाबा यांच्याशी कोणताही संबंध नाही. आम्ही त्यांना बोलवत नाहीत की ते आम्हाला बोलवत नाहीत. रवीच्या लग्नाच्या दोन-तीन महिन्यांनंतरच वाद होऊ लागले. सध्या मी जामनगरमध्ये एकटाच राहतो, रवींद्र वेगळा राहतो. बायकोने त्याच्यावर काय जादू केली आहे माहीत नाही. माझा तर मुलगा आहे, माझं हृदय जळून राख झालंय. त्याचे लग्न लावून दिले नसते तर बरे झाले असते. त्याला क्रिकेटर बनवले नसते तर बरे झाले असते. आमची ही अवस्था झाली नसती". हे म्हणणं आहे भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांचे.

रवींद्र जडेजा आणि सून रिवाबासोबतच्या नातेसंबंधावर त्यांनी 'दैनिक भास्कर'शी संवाद साधला. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या निमित्ताने रिवाबाने रवींद्र जडेजासोबत पतंग उडवतानाचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर रिवाबा गरोदर असल्याची अफवा पसरली होती. त्यानिमित्त अनिरुद्ध यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. अनिरुद्ध हे जामनगर येथील फ्लॅटमध्ये एकटेच राहतात.

लग्नाच्या तीन महिन्यांनंतरच घरात कलह

'मी तुम्हाला खरं सांगतोय. लग्नाच्या तीन महिन्यांनंतरच, सर्व काही माझे असावे, माझ्या नावावर असावे, असे रिवाबा म्हणू लागली. तिने कुटुंबाला त्रास देण्यास सुरूवात केली. तिला कुटुंब नको होते, तिला एकटे आणि मुक्तपणे जगायचे होते. मी वाईट आहे हे मान्य करतो, रवींद्रची बहीण नयनाबा पण वाईट आहे, पण कुटुंबात 50 लोक आहेत, सगळे वाईट आहेत का?

सासूचा जास्त हस्तक्षेप, नातीचा 5 वर्षांपासून चेहराही नाही पाहिला

'मी काहीही लपवत नाही. आमच्यात काही नातं नाहीये. मी त्यांच्या मुलीचा चेहराही 5 वर्षांपासून पाहिलेला नाही. रिवाबाचे आई-वडील विशेषत: रवींद्रची सासूच सर्व गोष्टी बघते. सासूचा हस्तक्षेप खूप आहे.

20 हजार रुपये पेन्शन, आजही फ्लॅटमध्ये रवींद्रसाठी वेगळी खोली

'माझी गावात जमीन आहे. पत्नीची 20 हजार रुपये पेन्शन येते. त्यातूनच मी खर्च भागवतो. मी २ बीएचके फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. दिवसातून दोनदा मोलकरीण जेवण बनवते. चांगला राहतो. मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगतो. आजही माझ्या फ्लॅटमध्ये रवींद्रसाठी वेगळी खोली आहे. पूर्वी तो याच खोलीत राहत होता. त्यात रवींद्रची शील्ड आणि जर्सी सजवली आहे. त्यामुळे त्याच्या सर्व आठवणी डोळ्यांसमोर राहतात. आताही रवी जेव्हा सामने खेळतो तेव्हा नजर त्याच्यावरच असते.

रिवाबाला हॉटेल तिच्या नावावर पाहिजे होतं, यामुळे संबंध बिघडले

रवींद्रची पत्नी रिवाबाच्या कुटुंबावर आरोप करताना अनिरुद्ध सिंह म्हणाले, 'रिवाबा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्या लोकांना रवींद्रची गरज नाही, त्यांना फक्त पैसा हवाय. नुकताच त्यांनी रवींद्रच्या पैशातून 2 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला. आम्हाला त्याची गरजही नाही. माझ्याकडे शेती आणि पेन्शन आहे. हॉटेल (जड्डू'स) सुद्धा आमचे आहे, जे नैनाबा सांभाळते. लग्नाच्या एका महिन्यानंतरच रिवाबाने रवींद्रला हॉटेल तिच्या नावावर करण्यास सांगितले होते. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. पण, नंतर रवींद्रने नयनाबाला फोन करून हॉटेल रिवाबाच्या नावे करण्यास सांगितले होते.

मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही

‘मी रवींद्रला फोन करत नाही. मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही. मी त्याला फोन केला नाही तर तोही मला कॉल करत नाही. या दु:खात मी रडतो. रक्षाबंधनाच्या दिवशी त्याची बहीण रडते, असे म्हणताना ते गहिवरले. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याला क्रिकेटपटू बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. मी रखवालदार म्हणून काम केले. पण माझ्यापेक्षा जास्त नैनाबा (मोठी बहिण) ने त्याची काळजी घेतली. आईप्रमाणे माया लावली. रवींद्र अवघा १७ वर्षांचा होता आणि त्याची आई लताबा यांचे अपघाती निधन झाले. लताबा तीन मुलांना सोडून गेली. ती वेळ माझ्यासाठी किती कठीण होती याचा तुम्ही अंदाज लावू शकता. माझ्याकडे नोकरी नव्हती. ते दिवस कसे घालवले ते मलाच माहितीये. मीच तिन्ही मुलांसाठी आई आणि वडील दोघेही होतो. आम्ही कोणीच एकमेकांपासून काही लपवत नव्हतो.

आईसाठी क्रिकेटपटू बनला -

'रवींद्रला आर्मी ऑफिसर बनवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी त्याला आर्मी ट्यूशन स्कूलमध्ये ६ महिने प्रशिक्षण दिले. ट्यूशनची शेवटची परीक्षाही तो पास झाला. पण, सैनिक शाळेत प्रवेश घेण्याच्या एक दिवस आधी त्याने क्रिकेटर व्हायचे सांगितले. आम्ही घरी याबद्दल बोललो आणि मग त्याने क्रिकेटर होण्याचे ठरवले. रवीने एक दिवस भारतीय संघात खेळावे, असे त्याच्या आईचे स्वप्न होते. एक दिवस भारतासाठी क्रिकेट खेळेल असे तो लहानपणीच आईला म्हणाला होता. त्याची आई नर्स होती. ती होती तोपर्यंत घरखर्च वगैरे व्यवस्थित भागत होता. पण तिच्या निधनानंतरचा काळ आठवला तर नशीबावर हसायला येतं. लताच्या मृत्यूच्या वर्षभरानंतर रवींद्रची अंडर-19 क्रिकेट विश्वचषक संघात निवड झाली. त्यांच्या संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा सर्व खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये मिळाले. तेव्हापासून आमची आर्थिक समस्या दूर होऊ लागली.

नैनाबा नसती तर रवींद्र इथपर्यंत पोहोचला नसता

खरे सांगायचे तर माझी मोठी मुलगी नैनाबा हिने रवींद्रसाठी माझ्यापेक्षा जास्त मेहनत घेतली आहे. ती नसती तर रवींद्र आज इथपर्यंत पोहोचू शकला नसता. आईच्या निधनानंतर रवींद्र खचला होता. नैनाबाने त्याला माया लावली. त्याच्या छोट्या-मोठ्या सर्व गरजांची खूप काळजी घेतली. पण, आता त्याला तिच्याशीही काहीच घेणं-देणं नाहीये, असेही ते अखेरीस म्हणाले.

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

"काँग्रेसनं एकाच नेत्याला १७ वेळा लॉन्च केलं, पण प्रत्येकवेळी तो फेल गेला..."फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

"उद्धव ठाकरे जेलमध्ये असतील..." अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

"ज्यावेळी पक्ष धोक्यात येतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात," फडणवीसांची शरद पवारांवर टीका...

कराडसह साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान