नवी दिल्ली : अनुभवी हरमनप्रीत कौरला आयर्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. अष्टपैलू दीप्ती शर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
१० जानेवारीपासून भारत-आयर्लंड महिला संघात राजकोट येथे ३ एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. १०, १२ व १५ जानेवारी या तारखांना भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सामन्यांना सुरुवात होईल. आयर्लंडचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर येणार आहे. हरमनप्रीतसह मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगलाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा पराभव पत्करल्यानंतर भारताने मायदेशात वेस्ट इंडिजला धूळ चारली. त्यांनी टी-२० मालिकेत २-१ असे, तर एकदिवसीय मालिकेत ३-० असे यश मिळवले. या मालिकांमध्ये हरमनप्रीत व रेणुका यांनी चांगली कामगिरी केली. तूर्तास त्यांना विश्रांती देण्यात आली असून मुंबईची सायली सतघरे व राघवी बिश्त यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, शफाली वर्मा, राधा यादव यांना या मालिकेसाठीही वगळण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिका रावलच स्मृतीच्या साथीने सलामीला येईल. तसेच जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, हरलीन देओल हे फलंदाज संघात कायम आहेत. वर्षाच्या अखेरीस भारतातच महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचे संघबांधणी करण्याचे उद्दिष्ट आहे.
फेब्रुवारीतील महिलांच्या आयपीएलनंतर भारतीय संघ जूनमध्ये ५ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
भारताचा संघ
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री, रिचा घोष, तेजल हसबनीस, राघवी बिश्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कन्वर, तिथास साधू, साइमा ठाकोर, सायली सतघरे.