नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या दोन तारांकित खेळाडूंनी अवघ्या आठवडाभराच्या अवधीत कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यामुळे क्रीडाविश्वात सध्या या दोघांचीच चर्चा सुरू आहे. इंग्लंड दौरा एका महिन्याच्या अंतरावर असताना या दोघांनी घेतलेली निवृत्ती अनेकांसाठी धक्कादायक ठरली. त्यामुळे रोहित-विराटला निवृत्त होण्यास प्रवृत्त केले का, त्यांच्या निवृत्तीमागे नेमका कुणाचा होत आहे, असे प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर निशाणाही साधत आहेत.
३८ वर्षीय रोहितने ७ मे रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या रोहितकडून इंग्लंड दौऱ्यात नेतृत्वासह फलंदाजीतही चमकदार कामगिरी अपेक्षित होती. मात्र अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या शोधात असल्याचे सांगितले. त्यामुळे रोहितपुढे फक्त फलंदाज म्हणून खेळण्याचा पर्याय होता. अखेरीस त्याने कसोटीतील गेल्या काही महिन्यांतील कामगिरी आणि भविष्याचा विचार करता थेट निवृत्तीचाच निर्णय घेतला. इन्स्टाग्रामवर फक्त एक स्टोरी टाकून रोहितने निवृत्ती जाहीर केली.
मुख्य म्हणजे जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत स्वत:हून संघाबाहेर बसल्यावर रोहितने त्याचा निवृत्तीचा विचार नसल्याचे सांगितले होते. तसेच फेब्रुवारीत तो रणजी स्पर्धेतही मुंबईकडून एक सामना खेळला. मात्र न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया संघांविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये रोहितला एकच अर्धशतक झळकावता आले होते, हेसुद्धा खरे. परिणामी कसोटीतील सुमार कामगिरी आणि अन्य बाबींनी त्याला निवृत्ती घेण्यास भाग पाडले, असे म्हणू शकतो.
दुसरीकडे ३६ वर्षीय विराटने १२ मे रोजी अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली. खरे तर रोहित निवृत्त झाल्यावरच दुसऱ्या दिवशी विराटनेसुद्धा बीसीसीआयकडे आपल्याला निवृत्त व्हायचे आहे, अशी मागणी केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र इंग्लंड दौऱ्यावर विराटचा अनुभव भारतीय संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याने बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्यास सांगितले. अखेरीस विराटने दोन दिवसांतच इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून निवृत्ती जाहीर केली.
रोहितप्रमाणेच विराटचाही गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये संघर्ष सुरू होता. न्यूझीलंडविरुद्ध त्याने ३ मालिकांमध्ये एका अर्धशतकासह फक्त ९३ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने पहिल्याच सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. मात्र त्यावेळी भारतीय संघ आधीच २००हून अधिक धावांनी आघाडीवर होता. दुसऱ्या कसोटीपासून विराटची बॅट पुन्हा थंडावली व ७ पैकी ४ डावांत तो १० धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. तसेच ऑफस्टम्प बाहेरील चेंडूवर तो संपूर्ण मालिकेत ७ ते ८ वेळा बाद झाला. त्यामुळे या सर्व बाबींचा विराटवर कुठे ना कुठे परिणाम झाला असणार.
बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना निवृत्तीस भाग पाडले, अशी चर्चा आहे. कारण २०२५च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम लढतीसाठी भारत पात्र ठरू शकला नाही. तसेच २०२७मध्ये जेव्हा पुन्हा अंतिम फेरी असेल, तोपर्यंत हे दोघेही खेळाडू असतील की नाही, याविषयी शंका होतीच. त्यामुळे निवड समितीने युवा कर्णधाराची निवड करण्याचे ठरवले. याव्यतिरिक्त, प्रशिक्षक गंभीरनेही युवा खेळाडूंसह पुढील दोन वर्षांसाठी संघबांधणी करण्यास प्राधान्य दिले. कसोटी मालिकेतील सुमार कामगिरी व ड्रेसिंग रूममधील चर्चा माध्यमांपर्यंत पोहोचवल्याने भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचीही अचानक हकालपट्टी करण्यात आली. काही खेळाडू याविरोधात होते.
याव्यतिरिक्त, बीसीसीआयने आता ४० दिवसांचा दौरा असेल तर खेळाडूंच्या कुटुबियांना १५ दिवसांपर्यंतच सोबत राहण्याची अनुमती दिली आहे. तसेच सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यानही त्यांना खेळाडूंना भेटण्यास मनाई आहे. सामना संपल्यावरच त्यांना आपल्या पत्नीला किंवा कुटुंबाला भेटण्याची परवानगी आहे. या सर्व नियमांना रोहित, विराटचा विरोध होता. अखेरीस या बाबींचा नकारात्मक परिणाम झाल्याने प्रथम रोहित व नंतर विराटनेही निवृत्तीचा मार्ग पत्करत चर्चांना पूर्णविराम लावला.
कुटुंबासोबत वेळ घालवायचा म्हणून...
विराटच्या निवृत्तीमागे बीसीसीआयच्या कुटुंबाशी निगडीत असलेल्या नियमाचे मुख्य कारण असल्याचे मत आहे. एका लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्र समुहाने दिलेल्या वृत्तानुसार विराट या नियमाच्या आधीपासून विरोधात आहे. विदेशी दौऱ्यांवर कुटुंब खेळाडूंच्या सोबत असणे गरजेचे आहे, असे विराटचे मत आहे. मात्र बीसीसीआयने ४० दिवसांचा दौरा असल्यास फक्त १५ दिवसांसाठीच कुटुंबियाला सोबत राहण्याची व प्रवास करण्याची मुभा दिली आहे. विराटला नुकताच दुसरे अपत्य झाल्याने तो शक्य होईल तेव्हा वेळ काढून लंडनला कुटुंबाची भेट घेण्यासाठी जातो. दरम्यान, मंगळवारी विराटने पत्नी अनुष्कासह वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले.