फुटबॉलपटू रोनाल्डिन्होचे वयाच्या ४६ व्या वर्षी पुनरागमन; इटलीतील तिसऱ्या श्रेणीच्या रेव्हेन्ना क्लबकडून खेळला सामना 
क्रीडा

फुटबॉलपटू रोनाल्डिन्होचे वयाच्या ४६ व्या वर्षी पुनरागमन; इटलीतील तिसऱ्या श्रेणीच्या रेव्हेन्ना क्लबकडून खेळला सामना

ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याने निवृत्तीनंतर दशकाहून अधिक काळाने पुन्हा एकदा क्लब फुटबॉलमध्ये पुनरागमन केले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्याने रविवारी इटलीतील तिसऱ्या श्रेणीच्या रेव्हेन्ना क्लबकडून सामना खेळला. या स्थानिक प्रतिस्पर्धी फोर्लीविरुद्धच्या सामन्यात रेव्हेन्नाने २-० असा विजय मिळवला.

Swapnil S

रेव्हेन्ना (इटली) : ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याने निवृत्तीनंतर दशकाहून अधिक काळाने पुन्हा एकदा क्लब फुटबॉलमध्ये पुनरागमन केले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्याने रविवारी इटलीतील तिसऱ्या श्रेणीच्या रेव्हेन्ना क्लबकडून सामना खेळला. या स्थानिक प्रतिस्पर्धी फोर्लीविरुद्धच्या सामन्यात रेव्हेन्नाने २-० असा विजय मिळवला.

रेव्हेन्नाच्या स्टेडिओ ब्रुनो बेनेली मैदानावर रोनाल्डिन्होचे चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले. सामन्यात त्याने उजव्या बाजूचा बचावपटू ज्युलिओ दोनाती याच्या पहिल्या गोलच्या चालीत महत्त्वाची भूमिका बजावली. गोल झाल्यानंतर त्याने सहकारी खेळाडूंसोबत आनंदोत्सव साजरा केला.

रेव्हेन्नाकडून खेळताना रोनाल्डिन्होने नेहमीचा १० क्रमांकाचा जर्सी परिधान केला होता. वयामुळे त्याचा पूर्वीचा वेग आणि चपळता काहीशी कमी झाली असली, तरी चेंडूवरील त्याचे नियंत्रण, अचूक पास आणि क्रॉस मारण्याची शैली प्रभावी होती. त्याच्या चेहऱ्यावरील नेहमीचे हास्यही चाहत्यांना पाहायला मिळाले.

जूनमध्ये रोनाल्डिन्होने इटलीतील सेरी सी स्पर्धेत खेळणाऱ्या रेव्हेन्ना क्लबशी अनपेक्षितपणे करार केला होता. २०१५ मध्ये ब्राझीलमधील रिओस्थित फ्लुमिनेन्स क्लबकडून खेळल्यानंतर क्लब फुटबॉलमधील हा त्याचा पहिलाच सामना होता. रविवारी झालेल्या सामन्यात पहिल्या सत्रात रेव्हेन्नाने १-० अशी आघाडी घेतल्यानंतर मध्यंतराला रोनाल्डिन्होला विश्रांती देण्यात आली.

रेव्हेन्ना क्लब सध्या सेरी सी स्पर्धेतील आपल्या गटातून पदोन्नती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या स्पर्धेचे भौगोलिक आधारावर तीन गट करण्यात आले आहेत. रेव्हेन्ना क्लबचे व्यवस्थापन सिप्रियानी रेस्टॉरंट ब्रँडशी संबंधित इग्नाझिओ सिप्रियानी यांच्याकडे आहे.

अप्रतिम तांत्रिक कौशल्य, चेंडूवरचे विलक्षण नियंत्रण, कल्पक ड्रिब्लिंग, ताकद आणि गोल करण्याची अफलातून क्षमता यामुळे रोनाल्डिन्होने फुटबॉलविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. मैदानावरील त्याचे प्रसन्न हास्य आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची शैलीही विशेष लोकप्रिय होती. बार्सिलोनाकडून खेळताना त्याने २०७ सामन्यांत ९४ गोल केले.

इटलीत दुसऱ्यांदा पुनरागमन

रोनाल्डिन्होचे इटलीतील हे दुसरे पुनरागमन ठरले आहे. यापूर्वी २००८ ते २०११ या कालावधीत त्याने एसी मिलानकडून तीन हंगाम खेळले होते. या काळात त्याने क्लबला सेरी-ए स्पर्धेचे एक विजेतेपद मिळवून देण्यात योगदान दिले. रोनाल्डिन्होने पॅरिस सेंट-जर्मेन आणि बार्सिलोना या नामांकित क्लबचेही प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या कारकिर्दीत २००२ च्या फिफा विश्वचषकाचे विजेतेपद आणि २००५ चा प्रतिष्ठेचा बलॉन डी’ओर पुरस्कार या दोन महत्त्वाच्या कामगिरींचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महागाईचा 'घाऊक' भडका; चलनवाढ १२.२९ टक्क्यांवर, ऑक्टोबरमध्ये नवीन उच्चांक

फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा

असभ्यता म्हणजे अश्लीलता नव्हे! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; एअर इंडिया क्रू मेंबरला दिलासा

आरक्षणाच्या चक्राकार धोरणाविरुद्धची याचिका रद्द; नियमांच्या पुनर्विचारासाठी सरकारकडे अर्ज करा - सुप्रीम कोर्ट

Mumbai : पालिका शाळेचा भूखंडही खासगी संस्थेच्या घशात? चारकोपमधील जागा भाडेपट्ट्याने देण्यास काँग्रेसचा विरोध