लंडन : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक स्टेडियमवरील मेरिलीबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) संग्रहालयात आता क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकरची प्रतिमा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. गुरुवारी सचिनच्याच उपस्थितीत या पोट्रेटचे अनावरण करण्यात आले आहे.
भारत-इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून लॉर्ड्स येथे तिसरी कसोटी सुरू झाली. लॉर्ड्स स्टेडियमला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. ऐतिहासिका वारसा असलेल्या या स्टेडियममधील एमसीसीचे संग्रहालय फार लोकप्रिय आहे. तेथे सचिनचे पोट्रेट लावून एमसीसीने त्याच्या कारकीर्दीचा गौरव केला आहे. तसेच लढत सुरू होण्यापूर्वी सचिननेच घंटानाद केला. लॉर्ड्स येथे सामना सुरू होण्यापूर्वी घंटा वाजवून शुभ सुरुवात केली जाते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली यांना आतापर्यंत हा मान मिळाला होता. सचिनने याविषयी खास ट्वीट करत हा क्षण फार अभिमानास्पद असल्याचे सांगितले. सचिनची पत्नी अंजली आणी मुलगी सारादेखील सामना पाहण्यासाठी यावेळी उपस्थित होत्या.