Photo : X 
क्रीडा

सर्फराझचा दीडशतकी तडाखा! मुंबईचा गोव्यावर ८७ धावांनी विजय; चौथ्या विजयासह अग्रस्थान कायम

मुंबईचा स्टार फलंदाज सर्फराझ खान याने सरत्या वर्षातील शेवटचा दिवस गाजवला. विजय हजारे करंडक स्पर्धेतील गोव्याविरुद्धच्या सामन्यात सर्फराझने ७५ चेंडूंत १५७ धावांची तडाखेबंद खेळी साकारत निवड समितीला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने गोव्यावर ८७ धावांनी विजय मिळवत क गटात १६ गुणांसह अग्रस्थान काबीज केले आहे.

Swapnil S

जयपूर : मुंबईचा स्टार फलंदाज सर्फराझ खान याने सरत्या वर्षातील शेवटचा दिवस गाजवला. विजय हजारे करंडक स्पर्धेतील गोव्याविरुद्धच्या सामन्यात सर्फराझने ७५ चेंडूंत १५७ धावांची तडाखेबंद खेळी साकारत निवड समितीला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने गोव्यावर ८७ धावांनी विजय मिळवत क गटात १६ गुणांसह अग्रस्थान काबीज केले आहे.

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत अवघ्या ५६ चेंडूंत शतक साकारणाऱ्या सर्फराझने बुधवारी गोव्याविरुद्धच्या सामन्यात १५७ धावा फटकावत मुंबईला ८ बाद ४४४ धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरादाखल गोव्याला ५० षटकांत ९ बाद ३५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलग चौथ्या विजयामुळे मुंबईने गटसाखळीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आता गटसाखळीतील तीन सामने शिल्लक असले तरी मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने मुंबई संघात पुनरागमन केले. यशस्वी आणि गेल्या सामन्यात दमदार खेळी करणारा अंगरिक्ष रघुवंशी यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. मात्र रघुवंशीला या सामन्यात चमक दाखवता आली नाही. वासुकी कौशिक याने रघुवंशीचा (११) अडसर दूर केला. त्यानंतर यशस्वीने मुशीर खानसह दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. अखेर दर्शन मिसाळ याने यशस्वीला (४६) स्नेहल कौठणकरकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली.

मुशीर आणि सर्फराझ खान या सख्ख्या भावांनी त्यानंतर गोव्याच्या फलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. मुशीरने ६६ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा फटकावल्या. एकीकडे सर्फराझचा झंझावात सुरू असतानाच त्याला मुशीरने चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भर घातली. जयपुरीया विद्यालय मैदानावर सर्फराझने चौकार आणि षटकारांची आतषबाजीच केली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि १४ षटकार लगावले. त्यापैकी ऑफस्पिनर ललित यादवला आणि दर्शन मिसाळला त्याने १० षटकार ठोकले. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला त्याने ८ षटकांत ७८ धावा चोपून काढल्या.

सर्फराझ खान ४२व्या षटकांत बाद झाला, मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची संधी त्याने वाया घालवली. मुंबईनेही त्यानंतर धावांची लयलूट करत अखेरच्या ८ षटकांत १०० धावा वसूल केल्या. त्यात यष्टीरक्षक हार्दिक तामोरे (२८ चेंडूंत ५३ धावा), शम्स मुलानी (१५ चेंडूंत २२ धावा) आणि तनुष कोटियन (१२ चेंडूंत नाबाद २३ धावा) तसेच कर्णधार शार्दूल ठाकूर (८ चेंडूंत २७ धावा) यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

मुंबईचे ४४५ धावांचे आव्हान पार करताना, अर्जुन तेंडुलकर (२४) आणि कश्यप बाखले (२१) यांनी गोव्याला आश्वासक सुरुवात करून दिली. ललित यादव (६४), अभिनव तेजराणा (१००) आणि दीपराज गांवकर (७०) यांनी फलंदाजीत चमक दाख‌वली. मात्र अन्य फलंदाजांची साथ त्यांना लाभली नाही.

शार्दूलची पाटा खेळपट्टीवरही छाप

कर्णधार शार्दूल ठाकूरने पाटा खेळपट्टीवर पुन्हा एकदा छाप पाडत तीन विकेट्स मिळवले. यशस्वी जैस्वालने लेगस्पिन गोलंदाजी करत तीन षटके टाकली. मात्र ५२ धावा देत त्यानेही दोन विकेट्स प्राप्त केले.

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

BEST Bus Accident : अपघातांची मालिका सुरूच! मानखुर्दमध्ये बसची डिव्हायडरला धडक, वाहतुकीवर परिणाम; एकाचा मृत्यू, Video

Wardha : भरधाव आयशर ट्रकची कारला पाठीमागून जोरदार धडक; समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, Video

Mumbai : बेकायदा फेरीवाल्यांवर पालिकेचा बडगा; ५६ हजारांहून अधिक जणांवर कारवाई

१५ डब्यांच्या बदलापूर लोकलच्या श्रेयासाठी राजकीय चढाओढ; तीन वर्षांची प्रतीक्षा संपली, प्रारंभी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर