हारून शेख/लासलगाव
निफाड तालुक्यातील देवगाव येथील सर्वेश कुशारे याची उंच उडीसाठी पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणातील पंचकुला येथे २९ जूनला झालेल्या स्पर्धेत सर्वेशने २.२५ मीटर उंच उडी मारून प्रथम क्रमांक पटकावत जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावर झेप घेतली. यापूर्वी तो ३६ व्या स्थानी होता.
देवगाव येथील डी. आर. भोसले विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत असताना सर्वेशने २०१० पासून उंच उडीला सुरुवात केली होती. क्रीडाशिक्षक रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नियमित सराव केला. २०११मध्ये जाधव यांनी मक्यापासून तयार केलेल्या भुशाच्या पोत्यावर फॉसबरी प्रकारची उडी मारण्याची प्रॅक्टिस सर्वेशने सुरू केली. या काळात त्याने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर अनेक बक्षिसे पटकावली आहेत.
सध्या पुण्यात भारतीय लष्करामध्ये सेवेत असलेल्या सर्वेशने बारावीपर्यंत देवगाव येथे शिक्षण घेतल्यानंतर उंच उडीच्या सरावासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक मॅट उपलब्ध नसल्याने सांगलीमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने प्रवेश घेतला. मात्र, तेथे त्याला अनेकांचा रोष पत्करावा लागला. त्याने पुन्हा देवगावची वाट धरून मक्याच्या भुशाच्या पोत्यावर पुन्हा सराव सुरू केला. या अगोदर त्याला थायलंडमध्ये एशियन गेम्समध्ये रौप्यपदक मिळाले होते. मागील महिन्यात कझाकिस्तानमध्ये स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. २०२०मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण काबिज केले.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या सर्वेशला उंच उडी प्रकाराची आवड निर्माण झाली आणि त्याने त्याच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रात नाव कमवायचे स्वप्न उराशी बाळगले. त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. आता त्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून आमच्यासह देशवासियांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा सर्वेशच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.