न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शुक्रवारी चाहत्यांना मोठा उलटफेर पाहण्यास मिळाला. स्पेनच्या तिसऱ्या मानांकित कार्लोस अल्कराझला दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे अल्कराझची सलग १५ विजयांची मालिका खंडीत झाली. त्याशिवाय जपानच्या नाओमी ओसाकाचेही आव्हान संपुष्टात आले.
आर्थर ॲश स्टेडियमवर झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत नेदरलँड्सच्या बिगरामानंकित बोटिक वॅन डी झँडस्कल्पने २०२२च्या विजेत्या अल्कराझला ६-१, ७-५, ६-४ अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. जागतिक क्रमवारीत तब्बल ७४व्या स्थानी असलेल्या झँडस्कल्पने फ्रेंच आणि विम्बल्डन विजेत्या अल्कराझला २ तास १९ मिनिटांत नेस्तनाबूत केले. अल्कराझने या वर्षी फ्रेंच व विम्बल्डनचे जेतेपद मिळवताना १४ व अमेरिकन ओपनमधील पहिली फेरी असे एकूण १५ सामने सलग जिंकले होते. मात्र त्याची ही मालिका संपुष्टात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही अंतिम फेरीत अल्कराझ पराभूत झालेला.
दरम्यान, पुरुष एकेरीच्या अन्य लढतींमध्ये इटलीच्या अग्रमानांकित जॅनिक सिनरने आंद्रे मिचेलसनला ६-४, ६-०, ६-२ असे नामोहरम केले. तसेच रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने मारोझेनवर ६-३, ६-२, ७-६ (७-५) अशी मात केली. टिमो पॉल व डॅन इव्हान्स यांनीही तिसरी फेरी गाठली.
महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित कॅरोलिना मुचोव्हाने ओसाकाला ६-३, ७-६ (७-५) असे पराभूत केले. पोलंडच्या अग्रमानंकित इगा स्विआटेकने एना शिबाराचा ६-०, ६-१ असा फडशा पाडला.