नवी दिल्ली : शुभमन गिल कर्णधार म्हणून इंग्लंडच्या दौऱ्यावर उत्तीर्ण झाला आहे. त्याला कसोटी तसेच एकदिवसीय संघाचे मिळालेले नेतृत्व हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे. कुणीही त्याच्यावर उपकार केलेले नाहीत. तसेच २०२७चा विश्वचषक अद्याप २ वर्षे दूर असून त्याच्याविषयी आता चर्चा नको, असे स्पष्ट मत भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केले.
गिल-गंभीर या कर्णधार-प्रशिक्षकांच्या कार्यकाळात भारताने प्रथमच एखादी मालिका जिंकली. यापूर्वी २५ वर्षीय गिलच्या नेतृत्वात ऑगस्ट महिन्यात भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले होते. आता गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली हे तारांकित खेळाडू गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसतील. तसेच गिलला टी-२० संघातही उपकर्णधारपदी नेमण्यात आले आहे. अनेकांना निवड समितीचा हा निर्णय पटलेला नाही.
“गिलने कर्णधार म्हणून दोन्ही कसोटी मालिकांमध्ये छाप पाडली आहे. फलंदाज म्हणून त्याच्या गुणवत्तेविषयी शंका नव्हतीच. इंग्लंडविरुद्ध पाच कसोटींमध्ये त्याने नेतृत्वगुणही दाखवून दिले. मी २०२७च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी किंवा एकदिवसीय विश्वचषकाचा फारसा विचार केलेला नाही. मात्र सध्या गिल हा भारताचा कर्णधार होण्यास पूर्णपणे पात्र आहे,” असे गंभीर म्हणाला.
जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा कर्णधारासह सर्व खेळाडूंचे कौतुक होते. मात्र पराभवातही खेळाडू व प्रशिक्षकांना पाठिंबा आवश्यक असतो. कर्णधाराच्या तुलनेत आपल्यालाच मानसशास्त्रज्ञाची गरज असल्याचेही गंभीर गमतीने सांगितले.
हे आकडे चुकवू नका!
१० भारताने गेल्या २३ वर्षांत वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १०वी कसोटी मालिका जिंकली. यापूर्वी २००२मध्ये भारताने विंडीजविरुद्ध अखेरची मालिका गमावली होती. दक्षिण आफ्रिकेनेसुद्धा १९९८ ते २०२४ या कालावधीत विंडीजविरुद्ध सलग १० कसोटी मालिकांमध्ये यश मिळवलेले आहे. त्यामुळे एखाद्या संघाविरुद्ध सलग मालिका जिंकण्याचा विक्रम सध्या भारत-आफ्रिका यांच्या नावावर संयुक्तपणे आहे.
१३ भारताचे या मालिकेत दोन्ही कसोटींत मिळून फक्त १३ फलंदाज बाद झाले. यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध २०००मध्ये भारताने इतके कमी फलंदाज गमावले होते.
१४ भारताने दिल्ली येथे सलग १४वी कसोटी जिंकली. यापूर्वी १९८७मध्ये भारताने येथे अखेरचा पराभव पत्करला होता.
१२२ आपल्याच देशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत भारताने १२२वा विजय नोंदवून तिसरे स्थान मिळवले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला (१२१) पिछाडीवर टाकले. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या देशात २६२, तर इंग्लंडने २४१ कसोटी जिंकल्या आहेत.