दुबई : शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांनी गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय प्रकारात भारतासाठी सातत्याने योगदान दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतही दोघे उत्तम लयीत आहे. त्यामुळे भविष्यात या दोघांपैकीच एखादा खेळाडू भारताचे किमान एकदिवसीय प्रकारात नेतृत्व करू शकतो, अशी प्रतिक्रिया भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे.
सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सलामीवीर गिलने दोन लढतींमध्ये अनुक्रमे नाबाद १०१ व ४६ धावा केल्या आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मुंबईकर श्रेयसने दोन सामन्यांत अनुक्रमे १५ व ५६ धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत गिलने सर्वाधिक २५९, तर श्रेयसने दुसऱ्या क्रमांकाच्या १८१ धावा केल्या होत्या. श्रेयसचे सध्याचे वय ३० वर्षे आहे, तर गिल २५ वर्षांचा आहे. तसेच गिल सध्या भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे. त्यामुळे गिलचे पारडे भविष्यात जड मानले जात आहे.
“भविष्यात गिल भारतीय संघाचा कर्णधार नक्कीच असेल. एकदिवसीय प्रकारात तो सध्या सर्वोत्तम फलंदाज आहे. संघ व्यवस्थापनाचा गिलवर विश्वास असून तोसुद्धा त्यानुसार कामगिरी करत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासोबत खेळून गिलचा खेळही परिपक्व झाला आहे. त्यामुळे गिल नक्कीच कर्णधारपदाचा दावेदार आहे,” असे माजी क्रिकेटपटू संजय बांगर म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही गिलकडे भविष्याच्या दृष्टीनेच उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे, असे सांगितले होते.
दुसरीकडे माजी क्रिकेटपटू व समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी श्रेयसचा जयजयकार केला. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून ५०० धावा करणारा श्रेयस भारताचा पहिलाच फलंदाज ठरला होता. “श्रेयसच्या खेळण्यामुळे भारतीय संघ सहज विजय मिळवणार की त्यांना संघर्ष करावा लागणार, हे अवलंबून असते. गेल्या २-३ वर्षांपासून तो चौथ्या स्थानी सातत्याने छाप पाडत आहे. आता त्याचे आखूड चेंडूंना खेळण्याचे कौशल्यही सुधारले आहे. कोणत्याही खेळपट्टीवर नैसर्गिक फलंदाजी करण्याची क्षमता श्रेयसकडे आहे. त्याने आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये स्वत:चे नेतृत्वही सिद्ध केले आहे. त्यामुळे त्याचा नक्कीच कर्णधारपदासाठी विचार केला जाऊ शकतो,” असे सिद्धू म्हणाले.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने सलग दोन सामने जिंकले आहेत. पाकिस्तान येथे ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत ८ संघांचा समावेश असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात भारतीय संघ मात्र त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. २०१३नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी आतुर असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध नुकताच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश संपादन करून पूर्वपरीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले. आता चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर लक्ष आहे.
विराटच्या फॉर्मविषयी प्रश्न विचारू नका!
पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराटने पुन्हा एकदा आपले महत्त्व अधोरेखित केले. आता तरी प्रेक्षकांनी तो फॉर्मात आहे की नाही. त्याला विश्रांतीची गरज आहे का, असे प्रश्न विचारणे थांबवा, असे मत विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले. विराटने २०२३नंतर एकदिवसीय प्रकारात प्रथमच शतक झळकावले. मात्र तो आऊट ऑफ फॉर्म कधीच नव्हता, असे ते म्हणाले.
न्यूझीलंडसह भारताची आगेकूच; अ-गटाचे चित्र स्पष्ट
न्यूझीलंडने सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशला नमवले. त्यामुळे अ-गटाचे चित्र स्पष्ट झाले.
अ-गटातून न्यूझीलंड व भारत यांनी प्रत्येकी दोन विजयांसह उपांत्य फेरी गाठली. तूर्तास धावगतीमुळे न्यूझीलंडचा संघ अग्रस्थानी आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात २ मार्चला लढत होणार आहे.
पाकिस्तान, बांगलादेश यांना सलग दोन पराभवांमुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.