नवी दिल्ली : आगामी इंग्लंड दौरा हा भारतीय क्रिकेट संघाचा नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलसाठी परीक्षा असेल. गिलच्या फलंदाजीतील कामगिरीवर त्याच्या नेतृत्वाचे यशापयश अवलंबून असेल, असे मत भारतीय संघाचे माजी निवडकर्ते साबा करीम यांनी व्यक्त केले.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर गिलकडे भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कसोटीतील गिल पर्वाला सुरुवात झाली आहे. फलंदाजीतील शैली हे गिलला देवाने दिलेली भेट आहे. मात्र कसोटी फलंदाज म्हणून तो अद्याप तितका नावारूपाला आलेला नाही. ३२ कसोटींत त्याला केवळ १,८९३ धावा जमवता आल्या आहेत. त्यात ४ शतकांचा समावेश आहे.
फलंदाजीतील त्याचे तंत्र उत्तम असले तरी कसोटीत फलंदाज म्हणून त्याला सामना जिंकवणारी सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र साबा करीम यांना त्याच्याबद्दल आत्मविश्वास आहे.
इंग्लंड दौऱ्यात त्याची परीक्षा आहे. तो त्यासाठी तयार असेल असा मला विश्वास आहे, असे करीम वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
खेळाडू म्हणून त्याच्यासाठी ही मोठी संधी आहे. फलंदाजीत त्याने धावा करण्याची आवश्यकता आहे. जर त्यात गिलला यश आले तर आपसुकच कर्णधार म्हणूनही तो ठसा उमटवू शकतो. यश ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो, असे करीम म्हणाले.
भारताच्या या माजी यष्टीरक्षक- फलंदाजाला भारतीय संघाकडून मोठी आशा आहे. युवा आणि अनुभवी खेळाडू यांच्यातील समन्वयाबाबत करीम यांनी समाधान व्यक्त केले.
या युवा भारतीय संघाकडून मला चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. ही मालिका अटीतटीची होणार असून भारतीय संघ त्यासाठी तयार असल्याचे करीम म्हणाले.
फिटनेसमुळे गोलंदाजी विभागात मोहम्मद शमी संघाबाहेर आहे. त्याची कमी भारताला जाणवणार आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंग हा या संघाचा भाग आहे. त्याच्या कडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. अर्शदिप हा हुशार वेगवान गोलंदाज आहे. शमीच्या अनुपस्थितीत गत इंग्लंड दौऱ्यातील अनुभव त्याला फायदेशीर ठरेल. निवड समितीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास योग्य आहे. त्याला खेळताना पाहायला उत्सुक असल्याचे साबा करीम म्हणाले.
करीम हे 'फिट इंडिया संडे सायकल'च्या २५व्या आवृत्तीचे प्रमुख पाहुणे होते. अशा उपक्रमांमुळे लोकांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता निर्माण होते आणि आरोग्यदायी राष्ट्र घडवण्यास मदत होते. समाजाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि उत्साह पाहून खूप आनंद होतो, असे करीम शेवटी म्हणाले.
आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. रोहित, विराट आणि आश्विन या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर प्रथमच भारतीय संघ दौऱ्यावर जात आहे.
करुण- साई यांच्याकडून अपेक्षा
करुण नायर याने इंग्लंड लायन्सविरुद्ध द्विशतक झळकावल्याबाबत करीम यांनी त्याचे कौतुक केले. तसेच साई सुदर्शनबाबतही त्यांनी आशावाद व्यक्त केला. करुण नायर अप्रतिम खेळला. आता त्याच्याकडे अनुभव आहे. साई सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कामगिरी उंचावत आहे. त्याला आता अनुभव आला आहे. ही दुकली इंग्लंडमध्ये कशी कामगिरी करते याची मला उत्सुकता असल्याचे करीम म्हणाले.