ICC T20 World Cup 2026 : सुपर ओव्हरचा दुहेरी थरार! दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानवर सरशी, नेमकं काय घडलं? 
क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : सुपर ओव्हरचा दुहेरी थरार! दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानवर सरशी, नेमकं काय घडलं?

टी-२० विश्वचषकात बुधवारी सकाळी झालेल्या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा दुहेरी थरार पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही लढत क्षणाक्षणाला पारडे बदलत होती. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू केशव महाराजने रहमनुल्ला गुरबाझला बाद केले आणि आफ्रिकेच्या रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब झाले.

Swapnil S

अहमदाबाद : टी-२० विश्वचषकात बुधवारी सकाळी झालेल्या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा दुहेरी थरार पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही लढत क्षणाक्षणाला पारडे बदलत होती. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू केशव महाराजने रहमनुल्ला गुरबाझला बाद केले आणि आफ्रिकेच्या रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब झाले.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील.

दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अफगाणिस्तान-आफ्रिका लढतीत प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने २० षटकांत ६ बाद १८७ धावा केल्या. रायन रिकल्टन (२८ चेंडूंत ६१) आणि क्विंटन डीकॉक (४१ चेंडूंत ५९) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने कडवी झुंज दिली. गुरबाझच्या ४२ चेंडूंतील ८४ धावांमुळे एकवेळ अफगाणिस्तान काही षटके राखूनच ही लढत जिंकेल असे वाटले.

मात्र वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी व महाराज यांनी उत्तम गोलंदाजी करून आफ्रिकेला पुनरागमन करून दिले. १९ षटकापर्यंत रशिद खानसह सर्व मुख्य फलंदाज बाद झाले होते. तेव्हा अफगाणिस्तानला ६ चेंडूंत १३ धावांची गरज होती. मात्र शेवटच्या षटकात कगिसो रबाडाने दोन नो-बॉल टाकले. नूर अहमदने षटकारही लगावला. मात्र ३ चेंडूंत २ धावांची गरज असताना फारुकी धावचीत झाला. त्यामुळे अफगाणिस्तान १९.४ षटकांत १८७ धावांत गारद झाला व सामना टाय झाल्याने सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला.

सुपर ओव्हरमध्ये नेमके काय घडले?

  • पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने एन्गिडीला ६ चेंडूंत १७ धावा चोपल्या. अझमतुल्ला ओमरझाईने त्यापैकी ५ चेंडूंत २ चौकार, १ षटकारासह १६ धावा केल्या. मग आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर व डेवाल्ड ब्रेविस फलंदाजीस आले. फारुकीच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आल्यावर ब्रेविस एक षटकार लगावून बाद झाला. मात्र ट्रिस्टन स्टब्सने ३ चेंडूंत प्रत्येकी एक चौकार-षटकार लगावल्यामुळे सामना पुन्हा टाय झाला.

  • दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मग स्टब्स आणि मिलर यांनी ओमरझाईची धुलाई करताना ६ चेंडूंत तब्बल २३ धावा लुटल्या. यामध्ये स्टब्सने १, तर मिलरने २ षटकार लगावले. २४ धावांचा पाठलाग करताना मोहम्मद नबी फिरकीपटू महाराजविरुद्ध दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. शिवाय पहिला चेंडूही निर्धाव ठरला होता. त्यामुळे गुरबाझ मैदानात आला तेव्हा ४ चेंडूंत त्यांना २४ धावांची गरज होती.

  • गुरबाझने महाराजला चक्क ३ सलग षटकार लगावल्यामुळे उत्कंठा आणखी वाढली. १ चेंडूत ६ धावांची गरज असताना महाराजने वाईड चेंडू टाकला. अखेरीस १ चेंडूत ५ धावांची गरज असताना गुरबाझ मात्र पॉइंटवर झेलबाद झाला आणि अफगाणिस्तानच्या पदरी निराशा पडली. मुख्य म्हणजे महाराजनेच गुरबाझला मुख्य लढतीत आणि मग सुपर ओव्हरमध्येही बाद केले. दडपणाखाली अफगाणिस्तानचा संघ ढेपाळला व त्यांचे काही निर्णयही चुकले. त्यामुळेच त्यांच्या पदरी निराशा पडली.

(ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड सामन्यापर्यंत)

गावठी भाषा, मॅनर्सलेस लोक...म्हणत मराठीचा अपमान करणाऱ्या PhysicsWallah च्या शिक्षकाला मनसेने दिला चोप, Video व्हायरल

'रिव्हर्स लेन'मुळे ठाणे ते मुंबई प्रवास सुसाट! पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

Video : धावत्या लोकलमधून थेट वैतरणा खाडीत पडला तरुण; खांबाला पकडून वाचवला जीव, मच्छीमारांच्या मदतीने थरारक सुटका

'एनए' परवानगी इतिहासजमा; महसूल विभागाचा मोठा निर्णय; बांधकाम नकाशा हीच परवानगी समजणार

Thane : शहापूरमध्ये चक्क सिगारेट वेंडिंग मशीन; रात्री १० नंतरही UPI वर मिळते सेवा, नेटकरी म्हणतात...