UEFA Euro 2024: बर्लिन : युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधणाऱ्या स्पेनने रविवारी मध्यरात्री युरो चषक फुटबॉल स्पर्धेचे विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. आपण फुटबॉल विश्वावर पुन्हा राज्य करण्यासाठी सज्ज असल्याचे सिद्ध करताना स्पेनने इंग्लंडला २-१ असे नेस्तनाबूत केले. इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा युरो चषकाने हुलकावणी दिली. तर स्पेनने १२ वर्षांनी ही (ENG vs ESP, Euro 2024 Final) प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली.
ऑलिम्पियास्टेडीओन येथे झालेल्या या लढतीत दोन्ही संघांमध्ये दमदार जुगलबंदी पाहायला मिळाली. इंग्लंड दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होती, तर स्पेनने पाचव्यांदा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पहिल्या सत्रात दोघांपैकी एकाही संघाला गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. ८० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत अखेर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ४७व्या मिनिटाला लॅमिन यमालच्या पासवर निको विल्यम्सने अप्रतिम गोल झळकावत स्पेनला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर स्पेनच्या संघात ६८व्या मिनिटाला अल्वारो मोराटाच्या जागी मिकेल ओयारझबालचे, तर ७०व्या मिनिटाला कॉबी मैनूच्या जागी कोल पाल्मरचे इंग्लंडच्या संघात आगमन झाले. हेच खेळाडू सामन्याला कलाटणी देणारे ठरले. ७३व्या मिनिटाला जूड बेलिंघमच्या पासवर पाल्मरने दमदार गोल नोंदवून इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेपर्यंत लांबणार, असे वाटू लागले.
मात्र ८६व्या मिनिटाला मार्क कुकुरेलाच्या अप्रतिम पासला ओयारझबालने हळूच स्पर्श केला व चेंडू गोलजाळ्यात विसावला. हाच गोल स्पेनचा विजय पक्का करणारा ठरला. अखेर पंचांनी सामना संपल्याची शिटी वाजवली आणि स्पेनच्या सेनसेशनल विजयावर शिक्कामोर्तब झाले. इंग्लंडचा पुन्हा स्वप्नभंग झाला.
> स्पेनने १९६४, २००८, २०१२ नंतर २०२४ म्हणजेच चौथ्यांदा युरो चषक उंचावला. या यादीत जर्मनी ३ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे.
> सलग दोन युरो चषकाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
> स्पेनने या स्पर्धेत सलग सात सामने जिंकले. युरो स्पर्धेत इतके सामने जिंकून जेतेपद मिळवणारा तो पहिलाच संघ ठरला. तसेच त्यांनी स्पर्धेत सर्वाधिक १५ गोल नोंदवले.
पुरस्कार विजेते
> अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : निको विल्यम्स
> स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : रॉड्री
> सर्वोत्तम युवा खेळाडू : लॅमिन यमाल