अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या बेभरवशी फलंदाजांविरुद्ध गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत धावांचा वर्षाव अपेक्षित आहे. त्यामुळे गुजरात विजयरथावर परतणार की हैदराबाद आणखी एका विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम राखणार, हे पाहणे रंजक ठरेल.
युवा शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातचा संघ ९ सामन्यांतील ६ विजयांच्या १२ गुणांसह गुणतालिकेत आघाडीच्या चार संघांमध्ये स्थान टिकवून आहे. मात्र गेल्या सामन्यात गुजरातला राजस्थानकडून पराभवाचा धक्का बसला. गुजरातच्या २०९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने १५.५ षटकांतच लक्ष्य गाठले होते. त्यामुळे आता घरच्या मैदानात खेळताना अहमदाबादच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. अहमदाबादने उर्वरित ५ पैकी ३ सामने जिंकले, तर ते गुणतालिकेत आघाडीच्या दोन संघांतील स्थानही पक्के करतील.
दुसरीकडे अनुभवी पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने ९ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे फक्त ६ गुणांसह तूर्तास हैदराबादचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी असला तरी ते अद्याप स्पर्धेच्या बाहेर गेलेले नाहीत. त्यातच गेल्या लढतीत हैदराबादने चेन्नईला पराभूत करून पुन्हा लय मिळवली. आता हैदराबादला आघाडीच्या फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.
दरम्यान, मोदी स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे गेले आहे. येथे सायंकाळच्या लढतीमध्ये दवही मोठ्या प्रमाणात येते. मात्र यंदाच्या हंगामात येथे झालेल्या आतापर्यंतच्या ४ पैकी ३ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. येथे १९० ते २०० धावाही अपुऱ्या ठरू शकतात. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करून २२० धावा उभारण्याचा प्रयत्न करेल.
आघाडीच्या त्रिकुटावर गुजरातची भिस्त
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी असलेला साई सुदर्शन, कर्णधार गिल व अनुभवी जोस बटलर या आघाडीच्या त्रिकुटावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. मधल्या फळीत वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, शर्फेन रुदरफोर्ड असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मात्र त्यांची इतकी चाचपणी झालेली नाही. गोलंदाजीत रशिद खानकडून गुजरातला अपेक्षित आहे. रशिदला यंदा लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तसेच गेल्या लढतीत मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा व इशांत शर्माच्या वेगवान त्रिकुटाला मार खावा लागला. इशांतऐवजी अन्य खेळाडूला संधी मिळू शकते. डावखुरा फिरकीपटू आर. साईकिशोर त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरत आहे. सांघिक कामगिरी केल्यास गुजरातला रोखणे अवघड जाईल.
हेड, अभिषेक, क्लासेनवरच हैदराबादच्या आशा
हैदराबादची फलंदाजी बेभरवशी आहे. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा व हेनरिच क्लासेन असे त्रिकुट त्यांच्या ताफ्यात आहे. मात्र १-२ लढत वगळता त्यांना सातत्य दाखवता आलेले नाही. मधल्या फळीत इशान किशन व अनिकेत वर्मा यांनीही अधूनमधून योगदान दिले आहे. नितीश रेड्डीचा फलंदाजी क्रम बदलल्याचा हैदराबादला लाभ झाला. अभिनव मनोहर उत्तम लयीत असून कामिंदू मेंडिसच्या समावेशामुळे हैदराबादकडे खोलवर फलंदाजी व उपयुक्त फिरकीपटूचा पर्यायही उपलब्ध आहे. कर्णधार कमिन्स व मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांनी धावा रोखणे गरजेचे आहे. हर्षल पटेल टिच्चून मारा करत आहे. हैदराबादने गतवर्षी उपविजेतेपद मिळवले होते. मात्र यंदा त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कमिन्सही गोलंदाज व कर्णधार म्हणून छाप पाडण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे हैदराबादचा संघर्ष चालू आहे. २०१६मध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या हैदराबादने मध्यंतरी सलग पाच वर्षे बाद फेरी गाठली होती. मात्र त्यानंतर त्यांची कामगिरी सातत्याने ढासळत चालली आहे. आता उर्वरित लढतींमध्ये हैदराबाद कमाल करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
विघ्नेशच्या जागी रघू मुंबईच्या संघात
डावखुरा युवा फिरकीपटू विघ्नेश पुथूर हाडाच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. त्यामुळे विघ्नेशच्या जागी ३२ वर्षीय लेगस्पिनर रघू शर्माला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. मूळ पंजाबकडून खेळणाऱ्या रघूला ३० लाख किमतीत मुंबईने करारबद्ध केले. ११ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याचे ५७ बळी असून टी-२०मध्ये त्याचे ३ सामन्यांत ३ बळी आहेत. कर्ण शर्मा व मिचेल सँटनर असे फिरकीपटू मुंबईकडे असल्याने रघूला लवकर संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विघ्नेशने यंदा चेन्नईविरुद्ध पदार्पण करताना लक्ष वेधले होते. मात्र दुर्दैवीरित्या तो आता स्पर्धेबाहेर गेला.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी गुजरातने ३, तर हैदराबादने फक्त १ लढत जिंकली आहे. एक सामना रद्द करण्यात आला होता. आकडेवारीवरून गुजरातचेच पारडे जड असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे हैदराबादने गुजरातला अहमदाबाद येथे आजवर एकदाही नमवलेले नाही. त्यामुळे यंदा त्यांना पलटवार करण्याची उत्तम संधी आहे.
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर, दसुन शनका.
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पटेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर, रविचंद्रन स्मरण.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप