जयपूर : रोहित शर्मा (३६ चेंडूंत ५३ धावा) आणि रायन रिकल्टन (३८ चेंडूंत ६१) या सलामीवीरांनी दमदार अर्धशतके झळकावली. त्याला गोलंदाजांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने गुरुवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी फडशा पाडला. सलग सहाव्या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. मुंबईने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १६.१ षटकांत ११७ धावांत गारद झाला. तसेच मुंबईने २०१२नंतर प्रथमच जयपूरमध्ये विजय नोंदवला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत २ बाद २१७ धावांचा डोंगर उभारला. रोहित व रिकल्टन या दोघांनीही स्पर्धेतील तिसरे अर्धशतक साकारले. त्यांनी ७१ चेंडूंत ११६ धावांची सलामी नोंदवली. रिकल्टनने ७ चौकार व ३ षटकार लगावले, तर रोहितने ९ चौकारांसह खेळी सजवली. ही जोडी माघारी परतल्यावर सूर्यकुमार यादव (२३ चेंडूंत नाबाद ४८) व हार्दिक पंड्या (२३ चेंडूंत नाबाद ४८) यांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली.
लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रेंट बोल्ट, दीपक चहर व जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान त्रिकुटापुढे राजस्थानचा संघ ढेपाळला. जोफ्रा आर्चरने ३० धावांची एकाकी झुंज दिली. बोल्ट व कर्ण शर्माने प्रत्येकी ३ बळी मिळवले. या पराभवामुळे राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. वैभव सूर्यवंशी (०), यशसी जैस्वाल (१३), नितीश राणा (९) पॉवरप्लेमध्येच माघारी परतल्याने राजस्थानचा पराभव पक्का झाला.