क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy : सूर्यकुमारचे वादळी अर्धशतक; मुंबईचा गुजरातवर ५ विकेट्स राखून विजय

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २९ चेंडूंत ८२ धावांची खेळी केली. त्याच्या या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सोमवारी गुजरातवर दणदणीत विजय मिळवला. गुजरातने दिलेले १९८ धावांचे लक्ष्य मुंबईने अवघ्या १५.४ षटकांत पूर्ण केले.

Swapnil S

कोलकाता : टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २९ चेंडूंत ८२ धावांची खेळी केली. त्याच्या या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सोमवारी गुजरातवर दणदणीत विजय मिळवला. गुजरातने दिलेले १९८ धावांचे लक्ष्य मुंबईने अवघ्या १५.४ षटकांत पूर्ण केले.

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १९७ धावा उभारल्या. अखेरच्या षटकांमध्ये आशुतोष शर्मा (२२ चेंडूंत ४२ धावा) आणि विशाल जयस्वाल (२१ चेंडूंत ३८ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

प्रत्युत्तरादाखल सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील मुंबईने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. सूर्यकुमारने आपल्या ८२ धावांच्या खेळीत सात षटकार आणि नऊ चौकार ठोकले. त्याला सर्फराज खानने उत्तम साथ दिली. सर्फराजने अवघ्या १७ चेंडूंत नाबाद ४० धावा केल्या.

भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून दिल्यानंतरही सूर्यकुमारला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले आहे. मात्र, सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीची छाप पाडली आहे. १४ नोव्हेंबरला स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध त्याने अवघ्या २१ चेंडूंत ६० धावा ठोकल्या होत्या. मुंबईकडून गोलंदाजीत शार्दूल ठाकूर आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत प्रभावी कामगिरी केली.

उत्तराखंडचा गोव्यावर विजय

गट ड मधील अन्य सामन्यात, उत्तराखंडने गोव्याचा पाच गडी राखून पराभव केला. गोव्याचा सलामीवीर अभिनव तेजराणा याने ३६ चेंडूंत ७६ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, त्यानंतर गोव्याचा डाव १९.४ षटकांत १६८ धावांवर आटोपला. उत्तराखंडने १८.१ षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. आरव महाजनने ३८ चेंडूंत नाबाद ६० धावा केल्या.

विदर्भाचा सलग दुसरा विजय

कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठ मैदानावर झालेल्या सामन्यात विदर्भाने ओदिशाचा आठ गडी राखून पराभव केला. स्पर्धेतील हा विदर्भाचा सलग दुसरा विजय ठरला. विदर्भाच्या नचिकेत भुटेने चार बळी घेत ओदिशाला २० षटकांत आठ बाद १६१ धावांवर रोखले. ओदिशाकडून गौरव चौधरीने २८ चेंडूंत ५३ धावांची सर्वोच्च खेळी केली. प्रत्युत्तरात विदर्भाचे सलामीवीर अथर्व तायडे आणि डॅनिश मालेवार यांनी ८० चेंडूंत १२५ धावांची भागीदारी करत संघाचा विजय सुकर केला. तायडेने ४८ चेंडूंत ७४ धावा केल्या, तर मालेवारने ४२ चेंडूंत नाबाद ६७ धावा ठोकल्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत मलेरियाचा उद्रेक; नऊ महिन्यांत साडेबारा हजार जणांना लागण; हिवतापमुक्त शहराचे आव्हान कायम

लातूर जिल्हा बँकेवर देशमुख घराण्याचा झेंडा; धीरज देशमुखांच्या पॅनेलने जिंकल्या १४ जागा

Mumbai : नॉन-सेस इमारतींनाही इन्सेंटिव्ह FSI; मिश्र पुनर्विकास प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय

अजित पवार यांची कार्यपद्धती थक्क करणारी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

Ajit Pawar Death: विमान अपघात चौकशी अहवाल लवकर प्रसिद्ध करा - मुख्यमंत्री