Photo : X (ddsportschannel)
क्रीडा

भारताच्या तन्वीचा ऐतिहासिक पराक्रम; उपांत्य फेरीसह जागतिक पदक निश्चित

भारताच्या तन्वी शर्माने शुक्रवारी ऐतिहासिक पराक्रम केला. १६ वर्षीय तन्वीने जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पदक निश्चित केले. स्पर्धेच्या इतिहासात गेल्या १७ वर्षांत प्रथमच एका भारतीयाने पदक पक्के केले आहे.

Swapnil S

गुवाहाटी : भारताच्या तन्वी शर्माने शुक्रवारी ऐतिहासिक पराक्रम केला. १६ वर्षीय तन्वीने जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पदक निश्चित केले. स्पर्धेच्या इतिहासात गेल्या १७ वर्षांत प्रथमच एका भारतीयाने पदक पक्के केले आहे.

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अग्रमानांकित तन्वीने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या साकी मासुमोटोला १३-१५, १५-९, १५-१० असे तीन गेममध्ये पराभूत केले. तिने ४७ मिनिटांत ही लढत जिंकून उपांत्य फेरी गाठली. नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. यापूर्वी अर्पणा पोपट व सायना नेहवाल यांनी कनिष्ठ स्पर्धेत पदके जिंकली होती. अर्पणा यांनी १९९६मध्ये रौप्य, तर सायनाने २००६मध्ये रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर सायनाने २००८मध्ये सुवर्णपदकही जिंकले. तन्वीसुद्धा आता सुवर्ण काबिज करेल, अशी आशा आहे.

महिला एकेरीत भारताची अन्य स्पर्धक उन्नती हूडाला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या अन्यापतने तिला १५-१२, १५-१३ अशी धूळ चारली. त्याशिवाय मिश्र दुहेरीत भाव्य छाबरा व विशाखा टोप्पो यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. चायनीज तैपई जोडीने त्यांच्यावर १५-९, १५-७ अशी मात केली. पुरुषांच्या दुहेरीत भार्गव राम व विश्वतेज यांना चीनच्या चेन जुंग व ल्यू टेंग यांच्याकडून १२-१५, १०-१५ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता सर्वस्वीपणे तन्वीवरच भारताच्या आशा टिकून आहेत.

तन्वीने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी करताना सर्वांना पराभूत केले आहे. शनिवारी तिला अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी असेल. एकीकडे कनिष्ठ गटात भारताचे स्पर्धक छाप पाडत असताना वरिष्ठ गटात मात्र भारताचा संघर्ष सुरू आहे. २०२५ या वर्षात फक्त आयुष शेट्टीच्या रुपात एकमेव भारतीयाने वरिष्ठ पातळीवरील स्पर्धा जिंकली आहे.

२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना एकही पदक जिंकता आले नाही. अनुभवी पी. व्ही. सिंधू, प्रणॉय, लक्ष्य सेन व सात्विक-चिराग यांनी निराशा केली. तर काहींना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन