क्रीडा

टीम इंडिया यजमानांना क्लीनस्वीप देण्यास उत्सुक; झिम्बाब्वेविरुद्धचा आज अखेरचा वन-डे सामना अटीतटीचा होण्याची शक्यता

भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेत मालिका याआधीच खिशात घातली आहे.

वृत्तसंस्था

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वन-डे सामना सोमवारी पुन्हा हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. टीम इंडिया यजमानांना क्लीनस्वीप देण्यास उत्सुक आहे, तर यजमान झिम्बाब्वे शेवट गोड करण्यास उत्सुक आहे. दोन्ही संघ विजयाचे प्रयत्न करणार असल्याने सामना अटीतटीचा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेत मालिका याआधीच खिशात घातली आहे. कर्णधार के एल राहुलच्या नेतत्वाखालील टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंना अपराजित राहायचे आहे. क्लीन स्वीप हेच त्यांचे लक्ष्य असणार आहे.

तिसऱ्या वन-डे सामन्यात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी झिम्बाब्वे कसून प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासाठी के एल राहुल आणि दीपक चहर यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरेल. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रजा आणि कर्णधार रेगिस चकाब्वा यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल.

या सामन्यात शुभमन गिल आणि ब्रॅडली इवान्स यांच्यातील जुगलबंदी औत्सुक्यपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. सिकंदर रझा आणि दीपक चहर यांची कामगिरी त्यांच्या संघांसाठी निर्णायक ठरू शकते.

आगामी आशिया चषकाआधी होणारा हा अखेरचा सामना असल्याने आशिया चषकात उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या राहुलला फलंदाजीचा सराव करण्यासाठी ही अखेरची संधी असणार आहे. या सामन्यानंतर राहुल थेट यूएईला रवाना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात फलंदाजी स्वीकारुन जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर राहण्याचा राहुलचा प्रयत्न राहील. पहिल्या सामन्यात राहुलला फलंदाजीची संधीच मिळाली नव्हती. दुसऱ्या वन-डेत राहुल सलामीला आला; पण एका धावेवर माघारी परतला. या दौऱ्यात राहुलने तब्बल सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आशिया चषकात रोहितसोबत तो सलामीला उतरणार आहे. त्यामुळे अखेरच्या वन-डेत राहुलला फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करावा लागेल.

प्रतिस्पर्धी संघ (संभाव्य)

भारत : के एल राहुल (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव. दीपक चहर.

झिम्बाब्वे : रेगीस चकाब्वा (कर्णधार, यष्टीरक्षक), तदिवानाशे मारुमानी, इनोसंट काया, वेस्ले माधेवेरे, सीअन विलियम्स, सिकंदर रझा, रेयान बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅडली इवान्स, विक्टर न्याउची, टंका चिवंगा.

आमने-सामने

भारत आणि झिम्बाब्वे ६५ वेळा एकमेकांपुढे उभे ठाकले. त्यापैकी भारताने ५३ सामने जिंकले, तर झिम्बाब्वेला अवघ्या १० सामन्यांत विजय मिळविता आला.

ठिकाण : हरारे स्पोर्ट्स क्लब

नाणेफेक : दुपारी १२.१५ वाजता

सामन्याची वेळ : दुपारी १२.४५ (भारतीय वेळेनुसार)

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले