क्रीडा

‘बॅझबॉल’मुळे कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता!

बॉयकॉट यांचा स्टोक्स आणि कंपनीला वेळीच सावरण्याचा सल्ला

नवशक्ती Web Desk

लंडन : ‘बॅझबॉल’ ही संकल्पना कसोटी क्रिकेटला हानी पोहोचवण्याची शक्यता आहे. यामुळे चाहत्यांचे मनोरंजन नक्की होईल. परंतु तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतीलच असे नाही, अशा शब्दांत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी बेन स्टोक्स आणि कंपनीला वेळीच सावरण्याचा इशारा दिला आहे.

स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या अॅशेस कसोटीत निसटता पराभव पत्करावा लागला. या कसोतील ८ बाद ३९३ धावांवर पहिल्याच दिवशी डाव घोषित करण्याचा निर्णय इंग्लंडच्या अंगलट आल्याचे सगळीकडे म्हटले जात आहे. स्टोक्स तसेच प्रशिक्षक ब्रँडन मॅकक्युलम यांनी मात्र इंग्लंडच्या भूमिकेची पाठराखण करताना यापुढेही ते याचप्रकारे कसोटी क्रिकेट खेळतील, असे सांगितले.

“इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ पद्धतीद्वारे कसोटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय धाडसी आहे. यामुळे त्यांना स्वत:चे तसेच चाहत्यांचे मनोरंजन करता येईल. परंतु सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागणे कठीण आहे. किंबहुना सातत्याने बॅझबॉल पद्धतीने क्रिकेट खेळल्यास कसोटीचा मूळ गाभा नाहीसा होईल,” असे ८२ वर्षीय बॉयकॉट म्हणाले.

“अॅशेस मालिकेचे इंग्लंडच्या इतिहासात प्रचंड महत्त्व आहे. जलदगतीने धावा करून, चौकार-षटकारांची आतषबाजी करून, विविधप्रकारे क्षेत्ररक्षण रचणे, या सर्व गोष्टी मी समजू शकतो. मात्र यामुळे तुम्ही अॅशेस मालिका गमावणार नाही, याकडेही लक्ष द्या,” असेही बॉयकॉट यांनी सांगितले. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी २८ जूनपासून लॉर्ड्स येथे रंगणार आहे.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार