क्रीडा

महाराष्ट्राच्या मार्गात 'रेल्वे'चा अडथळा! अहिल्यानगरमध्ये आजपासून पुरुषांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार

Swapnil S

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे गुरुवार, २१ मार्चपासून ७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धचा थरार रंगणार आहे. चार दिवस आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत गतउपविजेत्या महाराष्ट्राच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्राच्या मार्गात प्रामुख्याने भारतीय रेल्वे संघाचा मुख्य अडथळा असेल.

हरयाणाला झालेल्या गेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांना भारतीय रेल्वेकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तर त्यापूर्वी कोरोना काळाच्या अगोदर २०१९मध्ये झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने तिसरे स्थान प्राप्त केले होते. यंदा महाराष्ट्राकडून जेतेपदाची अपेक्षा आहे. प्रो कबड्डीत यंदा पुणेरी पलटणला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा ठाण्याचा अस्लम इनामदार यंदा महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

भारतीय कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्हाक्रीडा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी ५ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची ८ गटांत विभागणी करण्यात येणार असून महाराष्ट्राचा ब-गटात समावेश असेल. प्रत्येक गटातून २ संघ असे एकूण १६ संघ बाद फेरी गाठतील.

स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मॅटच्या ४ क्रीडांगणावर एकाच वेळी सामने पहावयास मिळतील. सामने सायंकाळच्या सत्रात विद्युतझोतात खेळविण्यात येतील. ३० हजार क्रीडारसिकांना स्पर्धेचा आनंद मनमुराद लुटता यावा, याकरता प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. स्पर्धेतील सामने वेळेवर सुरू करून वेळेत संपविण्याचा आयोजकांचा मानस आहे.

महाराष्ट्राचा संघ

अस्लम इनामदार (कर्णधार), आकाश शिंदे, संकेत सावंत, आदित्य शिंदे, प्रणय राणे, मयुर कदम, हर्ष लाड, शंकर गदई, किरण मगर, अरकम शेख, ओमकार कुंभार, शुभम राऊत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त