क्रीडा

श्रेयसची पाठदुखी, संघासाठी डोकेदुखी; इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटींना मुकण्याची शक्यता

विराटचा जवळचा मित्र एबी डीव्हिलियर्सने काही दिवसांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बातमी यूट्यूब व्हिडीओदरम्यान सर्वांना सांगितली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : मधल्या फळीतील मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरच्या पाठदुखीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटी सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. श्रेयसच्या पाठदुखीमुळे भारतीय संघाच्या डोकेदुखीत मात्र वाढ झाली आहे. आधीच काही प्रमुख खेळाडू अनुपलब्ध असल्याने आता संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे. उभय संघांतील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे सुरू होईल. या कसोटीसाठी भारताचा संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. पहिल्या दोन सामन्यांतून माघार घेणारा विराट कोहली या तसेच चौथ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध असेल. तसेच के. एल. राहुल व रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीतून सावरत आहे. मोहम्मद शमी संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. यामध्ये आता २९ वर्षीय श्रेयसचीसुद्धा भर पडल्याने भारतापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

श्रेयसने दोन सामन्यांतील चार डावांत अनुक्रमे ३५, १३, २७, २९ अशा धावा केल्या. यापूर्वी गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला पाठदुखीने ग्रासले होते. त्यानंतर श्रेयसवर शस्त्रक्रिया करण्यात आली व आशिया चषकाद्वारे त्याने पुनरागमन केले. मात्र श्रेयसनेच आता बीसीसीआयकडे आपली पाठ दुखत असल्याची तक्रार केली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने दिली. ११ तारखेला भारतीय संघ राजकोट येथे दाखल होणे अपेक्षित आहे. मात्र श्रेयसची दुखापत तसेच जडेजा, राहुलच्या तंदुरुस्तीविषयी अद्याप माहिती न मिळाल्याने भारताचा तिसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर करण्यात आलेला नाही.

विराटविषयी चुकीची माहिती दिली - एबी

विराटचा जवळचा मित्र एबी डीव्हिलियर्सने काही दिवसांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बातमी यूट्यूब व्हिडीओदरम्यान सर्वांना सांगितली होती. ‘विराट व त्याचे कुटुंबीय सुरक्षित असून विराटची पत्नी अनुष्का लवकरच त्यांच्या दुसऱ्या अपत्याला जन्म देणार आहे. त्यामुळे त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतली,” असे डीव्हिलियर्स म्हणाला होता. मात्र शुक्रवारी डीव्हिलियर्सने त्याविषयी माफी मागितली. “मी चूक केली. विराटने कोणत्या कारणास्तव माघार घेतली आहे, हे मला पूर्णपणे माहीत नाही. तो लवकरच भारतीय संघात परतेल, अशी आशा आहे. या प्रसंगी मी त्याच्या पाठिशी आहे,” असे डीव्हिलियर्स म्हणाला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी