क्रीडा

'या'आंतरराष्ट्रीय जलतरणपटूने केले लेक टाहोचे ३५ किलोमीटरचे अंतर पार

वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने अमेरिकेतील लेक टाहोचे ३५ किलोमीटरचे अंतर १२ तास ३७ मिनिटांत पार केले. अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळविला. शिवाय, वर्ल्ड ओपन वॉटर स्वीमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकाविणारा आशिया खंडातील पहिला जलतरणपटू होण्याचा मानही त्याने मिळविला.

कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन या वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या नामांकनामध्ये अमेरिकेतील कॅटलिना चॅनेल (३४ किमी), सान्ताबार्बारा चॅनेल (२० किमी), तसेच लेक टाहो लेंग्थ स्विम (३५ किमी) या अतिशय खडतर जलतरण मोहिमांचा समावेश आहे. प्रभातने ही तिन्ही आव्हाने यशस्वीरीत्या पार करत आशिया खंडातील प्रथम जलतरणपटूचा मान मिळविला.

समुद्र सपाटीपासून १८०० मीटर उंचीवरस्थित लेक टाहो लेंग्थ (३५ किमी) पोहणे अतिशय खडतर आव्हान असते. उंचीवर असल्यामुळे विरळ ऑक्सिजन त्याचप्रमाणे लेकचे पाणी ९९ टक्के शुद्ध असल्यामुळे पाण्याची घनता कमी असते. पोहण्यास अतिशय कठीण आणि रात्रीचे जलतरण या सर्व आव्हानांवर मात करत प्रभातने मोहीम फत्ते केली.

समुद्र सपाटीपासून उंचीवर ऑक्सिजन विरळ होतो. हे जलतरणासाठी अधिक त्रासदायक असते. त्यासाठी उत्तराखंड राज्यातील समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर स्थित नैनिताल येथील नैनी लेकमध्ये प्रभातने सराव केला. त्यासाठी त्याला तेथील स्थानिक लोकांचे सहकार्य मिळाले.

प्रभातने ट्रिपल क्राऊन ऑफ ओपन वॉटर हे नामांकन २०१७मध्ये पटकाविले होते. हा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण जलतरणपटू ठरला होता. त्याचबरोबर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सहा आव्हाने फत्ते करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू म्हणून त्याने लौकिक मिळविला होता. आजतागायत आंतरराष्ट्रीय १८ जलतरण मोहीम फत्ते करणारा तो एकमेव भारतीय जलतरणपटू आहे. अनेक विक्रमाने सन्मानित प्रभातला भारत सरकारने तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते २०१९मध्ये गौरविले. तसेच महाराष्ट्राचा सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराने २०२०मध्ये त्याला सन्मानित करण्यात आले. प्रभातच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस‌्मध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रभातच्या नावावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पाच विक्रमांची नोंद आहे.

लेक टाहोमध्ये जलतरण करण्यासाठी प्रभातने प्रथम रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्विमिंगपूलमध्ये सराव केला होता. सरावासाठी जलतरण तलाव उपलब्ध करून दिल्याबद्दल रामशेठ ठाकूर यांचे त्याने आभार मानले. प्रभातने कॅटलिना चॅनेल २०१६ मध्ये आणि सान्ताबार्बरा येथील चॅनेल २०१९मध्ये पार केले होते.

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये