क्रीडा

पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा आज मालवणी येथे समारोप

Swapnil S

मुंबई : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २६ जानेवारीपासून मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी पारंपरिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांचे अंतिम सामने २१ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्या संदर्भात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेदरम्यान प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

मालाड, मालवणी येथील क्रीडा भारती मैदानात मल्लखांब, लेझीम, लंगडी, रस्सीखेच, कबड्डी, पंजा लढवणे, ढोल ताशा या क्रीडा व कला प्रकारांचे अंतिम सामने संपन्न होतील. स्पर्धेच्या सांगता सोहळ्याला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ आणि इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. सांगता सोहळ्या दरम्यान बुधवारी दुपारी १ वाजता अंतिम सामन्यांना सुरुवात होईल. तर सामन्यांच्या नंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्य समारंभ व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होईल.

दरम्यान, मंगळवारी लगोरी स्पर्धेत मुंबई शहरातील दोन विभाग व उपनगरातील ४ विभागीय अंतिम विजेत्यांमध्ये महामुकाबाला झाला. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात उन्नत नगर एम.पी.एस. शाळेने बाजी मारली.

महिनाभरात मुंबई महापौर स्पर्धा होणार!

पारंपरिक क्रीडा महाकुंभात २ लाख, ५० हजार, १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मुंबई महापालिकेने सुद्धा खूप मोठी व्यवस्था व मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्याचे लोढा म्हणाले. तसेच कोरोनामुळे बंद पडलेली मुंबई महापौर चषक स्पर्धा कधी सुरू होणार, असे विचारले असता महिनाभरात त्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे आश्वासन लोढा यांनी दिले.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल

तुलसी एक्स्प्रेसमध्ये बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप; ठाणे रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

अखेर २५ दिवसांनी घरी परतला 'तारक मेहता...' चा सोढी; दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

का वाढेना मतदानाचा टक्का?