भुवनेश्वर : अनिकेत पोटेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई खिलाडीज संघाने अखेर चार सामन्यांनंतर पराभवाची कोंडी फोडली. अल्टिमेट खो-खो लीगमधील रोमहर्षक सामन्यात मुंबईने राजस्थान वॉरियर्सवर ३१-३० अशी सरशी साधली. अन्य लढतीत तेलुगू योद्धाजने ओदिशा जगरनॉट्सला २९-२८ असे अवघ्या एका गुणाच्या फरकाने नमवले.
भुवनेश्वर येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबई व राजस्थान या दोन्ही संघांनी सलग चार सामने गमावले होते. त्यामुळे कोण पराभवाची कोंडी फोडून गुणांचे खाते उघडणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते. निर्णायक वेळी ड्रीम रनचे गुण वसूल केल्याने मुंबईने राजस्थानला नमवले. मध्यंतराला मुंबईकडे १४-१३ अशी निसटती आघाडी होती. चौथ्या डावात संरक्षण करताना श्रीजेश एस. आणि गजानन शेंगाळ यांनी चमकदार कामगिरी केल्याने मुंबईने यश मिळवले. श्रीजेश सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
अन्य लढतीत प्रतीक वाईकरच्या (६ गुण) उत्कृष्ट आक्रमणामुळे तेलुगूने गतविजेत्या ओदिशावर २९-२८ अशी मात केली. किरण वसावे, अरुण गुणकी यांनीही अनुक्रमे १ मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत ड्रीम रनचे गुण वसूल केले. दिपेश मोरे सामनावीर ठरला. मंगळवारी पहिल्या लढतीत चेन्नई क्वीक गन्स विरुद्ध ओदिशा, तर दुसऱ्या लढतीत मुंबई विरुद्ध गुणतालिकेत अग्रस्थानी असलेला गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने येतील.
स्पर्धेत पोल मारून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत मुंबईचा अनिकेत पोटे ६ गुणांसह अग्रस्थानी आहे.