भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या दारुण पराभवानंतर या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. एकीकडे मोहम्मद सिराजने गोलंदाजीत कमाल केली. तर, दुसरीकडे विराट कोहलीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
पहिल्या सत्रात भारताची शानदार गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली असतानाच, स्टेडियममध्ये भजन वाजल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रियाही व्हायरल झाली. केपटाऊनमध्ये आफ्रिकेचा केशव महाराज फलंदाजीसाठी येताच 'राम सिया राम'चे भजन वाजले आणि विराट कोहलीने लगेचच प्रतिक्रिया दिली. भारताच्या माजी कर्णधाराने हात जोडून चाहत्यांची मने जिंकली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पहिले सत्र भारतासाठी संस्मरणीय-
आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ५५ धावांत गुंडाळले. मोहम्मद सिराजने गोलंदाजीत चमक दाखवत सहा गडी बाद केले. त्याला मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांची चांगली साथ लाभली, त्यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. सिराजने भारताला पहिले यश मिळवून दिले आणि चौथ्या षटकात एडन मार्करमला बाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात त्याने डीन एल्गरची विकेट घेतली. याशिवाय, सिराजने टोनी डी झॉर्झी, डेव्हिड बेडिंगहॅम, मार्को यॅन्सन आणि काइल व्हेरेने यांच्या प्रमुख विकेट घेतल्या. त्याने नऊ षटकांत अवघ्या 15 धावा देत 6 बळी टिपले.