क्रीडा

आम्ही रौप्यपदक जिंकले नाही; सुवर्णपदक गमावले,गोलकीपर पी. श्रीजेशची खंत

राष्ट्रकुल खेळासारख्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणे हीदेखील तशी एक मोठी गोष्ट आहे.

वृत्तसंस्था

बर्मिंगहॅमधील २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७-० अशा फरकाने पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आम्ही रौप्यपदक जिंकले नाही; सुवर्णपदक गमावले, अशी खंत गोलकीपर पी. श्रीजेशने व्यक्त केली.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या या हॉकी क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत पोहोचला होता; मात्र अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने संघाच्या आनंदावर विरजण पडले. भारतीय हॉकी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या गोलकीपर श्रीजेशने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

श्रीजेश म्हणाला की, “आम्ही रौप्यपदक जिंकले, हे निराशाजनक आहे. राष्ट्रकुल खेळासारख्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणे हीदेखील तशी एक मोठी गोष्ट आहे. संघात अनेक तरुण खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी हा एक चांगला धडा असणार आहे. जर पदके जिंकायची असतील तर ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघांना मागे टाकावेच लागेल. त्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल,”

त्याने पुढे सांगितले की, “संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणून अंतिम सामन्यात पराभूत होण्याची माझी दुसरी वेळ आहे. त्यामुळे जास्त वाईट वाटत आहे.”

त्याने स्पष्ट केले की, भारतीय संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून धडा घेईल. पुढील वर्षी ओडिशामध्ये होणारा विश्वचषक आणि चीनमधील हांगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय संघ अधिक चांगला खेळ करेल.

भारतीय पुरुष हॉकी संघ २०१०मधील दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हाही सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली होती.

अशी चपराक बसेल की, तुम्ही कधीच उठणार नाही! मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Grok - AI चा महिलांविरोधात गैरवापर; केंद्राची एलॉन मस्क यांच्या एक्सला नोटीस

कंत्राटदारांचे बूट चाटायला पालिकेच्या ठेवी नसतात! उद्धव ठाकरेंचे फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर

मराठी ही संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; साहित्य संमेलनाचे वाजले सूप

नवीन प्राप्तिकर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सज्ज राहा; केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अधिकाऱ्यांना आदेश