क्रीडा

क्रीडा मंत्रालयाचे निलंबन आम्हाला अमान्यच! ठरल्याप्रमाणे राष्ट्रीय स्पर्धा घेणार : संजय सिंह

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन केले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) नवे अध्यक्ष संजय सिंह यांनी सोमवारी आणखी एक वादग्रस्त विधान केले. क्रीडा मंत्रालय तसेच केंद्र शासनाने कुस्ती महासंघ निलंबित केलेले असले तरी आम्हाला हे निलंबन मान्य नाही. तसेच ठरल्याप्रमाणेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे स्पष्ट मत संजय यांनी व्यक्त केले.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन केले. मात्र तरीही बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याने साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली, तर बजरंग पुनिया व विनेश फोगट यांनी प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार परत केले. यानंतर काही दिवसांतच क्रीडा मंत्रालयाने नियमांचे भंग केल्याचे कारण देत नवनिर्वाचित महासंघ बरखास्त केले. तसेच नवी त्रिसदस्यीस हंगामी समिती नेमली. या समितीने वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २ ते ५ फेब्रुवारीदरम्यान जयपूर येथे होईल, असे जाहीर केले. मात्र संजय यांनी यास विरोध दर्शवला आहे.

“आम्ही निवडणूक लढवून जिंकून आलो आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने आमच्यावर लादलेले निलंबन निरर्थक आहे. तसेच हंगामी समितीने राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची तारीख व ठिकाण बदलून चूक केली आहे. राष्ट्रीय स्पर्धा आम्ही ठरवल्याप्रमाणेच होईल. आमच्याशी संलग्न असलेल्या राज्याचे कुस्तीपटू हंगामी समितीने जाहीर केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारच नाही,” असे संजय म्हणाले. तसेच यासंबंधी लवकरच बैठक घेऊन आम्ही क्रीडा मंत्रालयाशी संवाद साधणार आहोत, असेही संजय यांनी नमूद केले. आता यावर क्रीडा मंत्रालय काय प्रतिसाद देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी