PTI
क्रीडा

वजनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे खेळाडूची! विनेशची याचिका फेटाळल्याचे कारण देताना क्रीडा लवादाचे स्पष्टीकरण

Swapnil S

नवी दिल्ली : ऑलिम्पिकसारख्या जागतिक पातळीवर स्पर्धेत सहभागी होताना खेळाडूंनी त्यांचे वजन मर्यादेपेक्षा कमी राहील याची काळजी घ्यायला हवी. ही जबाबदारी सर्वस्वीपणे खेळाडूची तसेच त्याच्या सहाय्यक चमूची आहे. कोणत्याही परिस्थितीत खेळाडू यास अपवाद ठरू शकत नाही, अशा शब्दांत क्रीडा लवादाने भारताच्या विनेश फोगटची याचिका फेटाळण्यामागील कारण स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या दिवशी वजनाच्या बाबतीत असा परिणाम आला तर, तो कठोर मानायला हवा.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजन गटातून खेळताना विनेशने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या वजनात १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला अंतिम फेरीसाठी अपात्र धरण्यात आले होते. या निर्णयाविरोधात विनेशने ऑलिम्पिकसाठी नियुक्त केलेल्या हंगामी क्रीडा लवाद समितीकडे याचिका दाखल केली होती. तीनवेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर क्रीडा लवादाने विनेशची याचिका फेटळाल्याचे जाहीर केले. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तसेच तिचे भारतातही दणक्यात आगमन झाले. दरम्यान, क्रीडा लवादाने विनेशचे अपील का फेटाळण्यात आले या संदर्भातील निर्णय प्रकाशित केला.

“वजनी गटांच्या स्पर्धेत वजन मर्यादेसंदर्भात तयार केलेले नियम सर्व खेळाडूंसाठी समान आहेत. यासाठी कोणताही अपवाद नाही. आपले वजन मर्यादेपेक्षा कमी राहील याची खात्री करणे ही केवळ खेळाडूची जबाबदारी आहे,” असे क्रीडा लवादाने निर्णयात म्हटले आहे. या घटनेत विनेशचे वजन मर्यादेपेक्षा जास्त होते यात प्रश्नच नाही. याचे पुरावे विनेशला स्पष्टपणे आणि थेट सुनावणीच्या दरम्यान सादर केले. तिचे वजन १०० ग्रॅम अधिक भरले होते. हे प्रमाण खूप कमी असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे विनेशचे म्हणणे होते. विशेषत: मासिकपाळीपूर्वीच्या काळात पाणी प्यायल्याने किंवा पाणी शरीरात टिकवून ठेवल्यामुळे असे घडू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला होता.

संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमानुसार जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत दोन्ही दिवशी वजन अनिवार्य असते. दुसऱ्या दिवशी खेळाडू माघार घेणार असला, तरी त्याला वजन द्यावेच लागते. मानांकन स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन किलो वजनाचा फरक मान्य केला जातो. पण, जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत असे करता येत नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र, अंतिम फेरीपूर्वीच विनेश अपात्र ठरल्यामुळे कुस्ती जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. अव्वल मानांकित युई सुसाकीवर मात केल्यावर तर विनेशलाच संभाव्य विजेती म्हणून गणले जात होते.

“दुसऱ्या दिवशी केलेल्या वजनात आलेले अपयश हे विनेशने केलेल्या एखाद्या बेकायदा किंवा चुकीच्या कृतीमुळे झालेले नसले, तरी त्या अपयशाचा परिणाम हा कठोरच मानला पाहिजे,” असे नियुक्त क्रीडा लवाद डॉ. ॲनाबेल बेनेट म्हणाले.

हे आहेत क्रीडा लवादाचे निष्कर्ष

  • विनेशने स्वेच्छेने ५० किलो वजन गट निवडला.

  • ५० किलोपेक्षा वजन कमी राखणे हे विनेशला स्पर्धेपूर्वीच ठाऊक होते.

  • विनेश अनुभवी कुस्तीपटू आहे. यापूर्वी या नियमांतर्गत विविध स्पर्धा खेळली आहे.

  • विनेशला नियमाची पूर्णपणे कल्पना होती.

  • खेळाडूला एकाच वजनी गटात सहभाग घेता येतो, हेदेखील तिला माहीत होते.

  • यामुळे पहिल्या दिवशी तसेच अंतिम फेरीच्या दिवशीही वजन नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी विनेशचीच आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत