क्रीडा

Wimbledon 2025: नशिबाची साथ! दोन सेट गमावूनही सिनर उपांत्यपूर्व फेरीत

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सोमवारी रात्री इटलीचा अग्रमानांकित यॅनिक सिनर दोन सेटने पिछाडीवर होता. मात्र तिसऱ्या सेटमध्ये प्रतिस्पर्धी गिग्रोर दिमित्रोव्हच्या छातीजवळील भागाला...

Swapnil S

लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सोमवारी रात्री इटलीचा अग्रमानांकित यॅनिक सिनर दोन सेटने पिछाडीवर होता. मात्र तिसऱ्या सेटमध्ये प्रतिस्पर्धी गिग्रोर दिमित्रोव्हच्या छातीजवळील भागाला दुखापत झाली. स्नायू ताणले गेल्याने दिमित्रोव्हला नाइलाजास्तव माघार घ्यावी लागली आणि सिनरने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पांढरा पोशाख आणि हिरव्यागार गवतावर खेळवण्यात येणाऱ्या विम्बल्डनला गौरवशाली इतिहास आहे. १८८७ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १३८वे पर्व आहे. बोरिस बेकर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा विम्बल्डनला लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा जुलै महिना सुरू होतो. तेव्हा आपसुकच भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. लंडनमधील विम्बल्डन या गावात ग्रास कोर्टवर (हिरवे गवत) ही स्पर्धा रंगते. आता २१व्या शतकात टेनिसमध्ये नवे तारे उदयास येत असून तेसुद्धा विम्बल्डनचा समृद्ध वारसा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत बल्गेरियाचा १९वा मानांकित दिमित्रोव्ह अग्रमानांकित सिनरविरुद्ध ६-३, ७-५ असा आघाडीवर होता. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंत २-२ अशी बरोबरी होती. मुख्य म्हणजे तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला सिनरच्याही उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. मात्र तो जिद्दीने खेळत राहिला.

मात्र तिसऱ्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी झाल्यावर ३४ वर्षीय दिमित्रोव्ह कोर्टवरच छाती पकडून बसला. त्याला भरपूर वेदना झाल्या. डॉक्टरांनी तपासणी केल्यावरही दिमित्रोव्हला खेळणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी दिमित्रोव्हला सामना सोडावा लागला व सिनरने आगेकूच केली. सिनरने स्वत: अशाप्रकारे विजय मिळवणे फारच दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच तो दिमित्रोव्हला कोर्टवरून बाहेर नेतानाही सहाय्य करताना दिसला. अल्कराझ आणि जोकोव्हिच यांच्यासह सिनर पुरुष एकेरीत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

फ्रिर्ट्झ, सबालेंका उपांत्य फेरीत

विम्बल्डनमध्ये मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेचा पाचवा मानांकित टेलर फ्रिट्झ आणि बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंका यांनी दमदार विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. फ्रिट्झने १७व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हला ६-३, ६-४, १-६, ७-६ (७-४) असे चार सेटमध्ये पराभूत केले. फ्रिट्झ प्रथमच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सबालेंकाने लॉरा सिगमंडला ४-६, ६-२, ६-४ असे पिछाडीवरून तीन सेटमध्ये नमवले. सबालेंकाने तिसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून तिला आता पहिले विम्बल्डन जेतेपद खुणावत आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत