लंडन : चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी सर्वात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे चाहत्यांना वेध लागले आहेत. विम्बल्डनला सोमवार, ३० जूनपासून सुरुवात होणार असून १३ जुलैपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
पांढरा पोशाख आणि हिरव्यागार गवतावर खेळवण्यात येणाऱ्या विम्बल्डनला गौरवशाली इतिहास आहे. १८८७ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १३८वे पर्व आहे. बोरिस बेकर, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा वारसा विम्बल्डनला लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी जेव्हा जुलै महिना जवळ येतो, तेव्हा आपसुकच भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. लंडनमधील विम्बल्डन या गावात ग्रास कोर्टवर (हिरवे गवत) ही स्पर्धा रंगते. आता २१व्या शतकात टेनिसमध्ये नवे तारे उदयास येत असून तेसुद्धा विम्बल्डनचा समृद्ध वारसा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे. स्पेनचा कार्लोस अल्कराझ, इटलीचा जॅनिक सिनर ही यांपैकीच काही नावे. मात्र ‘फॅब फोर’मधील नोव्हाक जोकोव्हिच वयाच्या ३८व्या वर्षीही युवा पिढीला आव्हान देत आहे. २०२४मध्ये पुरुष एकेरीत अल्कराझने, तर महिलांमध्ये बार्बोरा क्रेजिकोव्हाने बाजी मारली.
दरम्यान, शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असल्याने सिनरलाच पुरुषांमध्ये अग्रमानांकन देण्यात आले आहे. तर जूनमध्ये फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्कराझला दुसरे मानांकन लाभले आहे. सिनर व जोकोव्हिच यांनी अपेक्षित वाटचाल केली, तर उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात. दुसरीकडे अल्कराझला झ्वेरेव्ह, मेदवेदेव यांचा अडथळा पार करावा लागेल.