नुकतेच महिला महिला प्रीमिअर लीग २०२३साठी (WPL 2023) लिलाव प्रक्रिया पार पडली. यानंतर आता महिला प्रीमिअर लीग २०२३चे वेळापत्रक जाहीर झाले असून या वेळापत्रकानुसार एकूण २० साखळी सामने खेळवले जाणार आहेत. तसेच, ही स्पर्धा तब्बल २३ दिवस चालणार आहे. क्रिकेटप्रेमींना आत्तापासूनच या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे.
महिला प्रीमिअर लीग २०२३चा पहिला सामना हा ४ मार्चला होणार असून अंतिम सामना हा २६ मार्चला खेळवण्यात येईल. ४ मार्चपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामात एकूण २० साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर प्लेऑफचे २ सामने होणार आहेत. एलिमिनेटर सामना २४ मार्चला डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार असून २६ मार्चला ब्रेबॉन स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.