क्रीडा

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले!

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे २०२६मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळण्यात आल्याने भारताला प्रामुख्याने मोठा धक्का बसला आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन झाल्याने एकप्रकारे भारताला दिलासा मिळाला आहे. परंतु तिरंदाजीकडे मात्र पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली. यामध्ये २० खेळ आणि २६ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या वर्षी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वादग्रस्तरीत्या वगळण्यात आले होते. मात्र २०२६च्या स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे. राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताला सर्वाधिक १३५ पदके (६३ सुवर्ण, ४४ रौप्य व २८ कांस्य) ही नेमबाजीत मिळाली आहे. २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकूण पदकांपैकी २५ टक्के पदके ही नेमबाजांनी मिळवून दिली होती. या स्पर्धेत भारताने एकूण ६६ पदके जिंकली होती, ज्यापैकी १६ पदके (७ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कांस्य) नेमबाजीत मिळाली होती.

कुस्तीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात येणे हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवताना सर्व १२ वजनी गटांत पदके (६ सुवर्ण, १ रौप्य, ५ कांस्य) पटकावली होती. २०१० पासून सलग चार पर्वांमध्ये कुस्तीचा समावेश होता. परंतु कुस्ती हा खेळ ऑस्ट्रेलियामध्ये फारसा प्रचलित नाही. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचे खेळ हे यजमान देशाकडून निवडले जातात.

तिरंदाजी हा खेळ केवळ दोन (१९८२ आणि २०१०) राष्ट्रकुल स्पर्धामध्ये खेळला गेला आहे. या खेळाच्या पदकतालिकेत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिरंदाजीचा समावेश न होण्याचा भारताला फटका बसू शकेल. काही महिन्यांपूर्वी २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खेळांची प्रारंभिक यादी जाहीर करण्यात आली होती आणि यात नेमबाजी, कुस्ती व तिरंदाजी या खेळांचा समावेश नव्हता. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला पत्र लिहून आपली नाराजी कळवली होती. या तीन खेळांना वगळण्यात येणे हे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर अंतिम यादीत नेमबाजीचा समावेश करण्यात आला.

या खेळांचे होणार पदार्पण

२०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेत नौकानयन, गोल्फ, बीएमएक्स सायकलिंग या क्रीडा प्रकारांचा प्रथमच समावेश करण्यात येणार आहे. तसेच या तिन्ही प्रकारांच्या पॅरा-स्पर्धा (अपंगांच्या) खेळवण्यासाठीही व्हिक्टोरिया राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजक प्रयत्नशील आहेत. १७ ते २९ मार्च या कालावधीत २०२६ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेच्या आयोजनाद्वारे व्हिक्टोरिया राज्याला तीन अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक महसूल मिळणे अपेक्षित आहे.

Video : बिनशर्त पाठिंब्यानंतर नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, समोर आला पहिला टिझर

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस