सिंगापूर : जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या (डब्ल्यूटीसी) आगामी तीन हंगामांच्या अंतिम फेरीचे यजमानपद इंग्लंडला देण्यात आले आहे. आयसीसीने ही घोषणा केली. रविवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
२०२७, २०२९ आणि २०३१ या हंगांमात होणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरी जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. कारण इंग्लंडमध्ये या कालावधीत क्रिकेटचा हंगाम असतो.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी २०२१ मध्ये डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवले होते. हा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. २०२३ मधील अंतिम सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानात खेळला गेला होता. २०२५ चा अंतिम सामना लॉर्ड्सवर झाला होता.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड यांना आगामी डब्ल्यूटीसीच्या ३ हंगामांतील अंतिम सामन्यांचे यजमानपद देण्यात आले आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याचे पहिले तीन हंगाम इंग्लंडमधील विविध शहरांत झाले होते, असे आयसीसीने म्हटले आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डचे प्रमुख रिचर्ड गोल्ड म्हणाले की, इंग्लंड आणि वेल्सला पुढील तीन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. इंग्लंडच्या क्रिकेटचा हा एक प्रकारे सन्मान आहे. आम्ही आयोजनासाठी सज्ज आहोत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचे आतापर्यंत तीन हंगाम झाले आहेत. पहिल्या हंगामात न्यूझीलंडने विजेतेपद पटकावले होते. दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजेतेपदावर मोहोर उमटवली. अलिकडेच झालेल्या तिसऱ्या हंगामात दक्षिण आफ्रिकेने सरशी साधली. दक्षिण आफ्रिकेने तगड्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचे पाणी पाजून पहिल्यांदाच जेतेपदाची गदा उंचावली.