ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे जिल्ह्यातून टोकाचा विरोध होत असला तरी जिल्ह्यात या प्रकल्पाच्या कामाला वेग आला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर ठाणे आणि पालघरच्या ९५ गावे आणि शहरांमधून जाणार आहे. गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळील शिळफाटा ते झारोली गावांच्या दरम्यान असलेला हा मार्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील ९५ गावे आणि शहरांमधून जाणार आहे. 'कॉरिडॉर' अंतर्गत १३५ किमीपैकी १२४ किमीमध्ये ११ स्टील पुलांसह वायडक्ट आणि पुलाचा समावेश असणार आहे. या विभागात सात डोंगरी बोगदे असतील. यासह स्थानके आणि डेपोमध्ये ठाणे, विरार आणि बोईसर यातीन स्थानकांसह ठाणे येथे रोलिंग स्टॉक डेपोचे नियोजन करण्यात गुजरात-महाराष्ट्र आले आहे. 'क्रॉसिंग' मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मुंबई उपनगरीय मार्ग आणि 'एलिव्हेटेड मुंबई मेट्रो लाइन ५' यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमधून हा मार्ग जाणार आहे.
या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. हा प्रकल्प मुंबईपासून जवळ असल्यामुळे रेल्वे मार्ग, महामार्गासह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पही या भागात उभारण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम प्रगतीमध्ये भू-तांत्रिक तपासणी, डोंगरी बोगद्यांचे काम आणि घाटाच्या कामांसाठी अंदाजे २६५ ओपन फाऊंडेशन (सुमारे ११ किमी) पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. बोईसर आणि विरार स्थानकांवरही पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या भागाचे बांधकाम जसजसे पुढे जाईल तसतसे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या माध्यमातून त्या त्या भागाचे परिर्वतन होणार असल्याचे म्हटले जात आहे.
वैतरणा नदीवर सर्वात लांबीचा पूल
राष्ट्रीय महामार्ग-४८ आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग-३ या प्रमुख महामार्गावरही हा मार्ग जाणार आहे. 'नदी पूल' या विभागात चार प्रमुख नद्यांवर पूल असतील आणि सर्वात आव्हानात्मक उल्हास नदीवरील ४६० मीटर स्टील पूल (१००+ १३०, १३० + १०० मीटर स्पॅन) चा समावेश असणार आहे. या प्रकल्पातील सर्वात वजनदार स्टील संरचना ९६७२ मेट्रिक टन असणार असून, वैतरणा नदीवरील सर्वात लांब पूल २.३२ किमी लांबीचा असणार आहे.