ठाणे

बदलापुरातील शाळेवर प्रशासकाची नेमणूक; हलगर्जीपणाच्या प्रकरणानंतर कारवाईचा धडाका

Swapnil S

उल्हासनगर : बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर प्रकरणानंतर शाळेच्या प्रशासनावर ठेवण्यात आलेल्या हलगर्जीच्या आरोपामुळे वातावरण तंग झाले आहे.

आंदोलकांच्या संतापाला राज्य सरकारने त्वरित प्रतिसाद दिला आणि शाळेची कमिटी बरखास्त केली. या ठिकाणी शाळेचा कारभार सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकाची नेमणूक केली आहे.

आज या प्रशासकांमध्ये नेमण्यात आलेल्या अधिकारी कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमलेल्या विश्वनाथ पाटील यांनी शाळेचा दौरा केला. त्यांनी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी शाळेतील सर्व प्रक्रिया आणि व्यवस्थापनाची पाहणी केली आणि भविष्यातील सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

कुंदा पंडित यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करणे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य वातावरण आणि शिक्षणाची संधी मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

राज्य सरकारने घेतलेली ही कठोर पावले आणि शाळेत प्रशासकाची नेमणूक हे या प्रकरणात सरकारची गांभीर्यता दाखवते. या घटनेमुळे इतर शाळांमध्ये देखील जागरूकता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात

बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर शाळेच्या हलगर्जीपणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. घटनेच्या वेळी आणि त्यानंतरचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बंद असल्याचा खुलासा होऊन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळेवर गंभीर आरोप करण्यात आले. या घटनेने देशभरात खळबळ माजवली असून, अखेर शाळा प्रशासनाने जाग येत शाळेतील सुरक्षेसाठी नव्याने सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर उचललेले हे पाऊल उशिरा आलेले शहाणपण असल्याची चर्चा सध्या शहरवासीयांमध्ये सुरू आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले, ज्यामुळे शाळेवर सर्वत्र टीकेचा भडिमार झाला. अखेर, शाळा प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देत ज्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले नव्हते त्या ठिकाणी नव्याने सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, जे सीसीटीव्ही बंद होते त्यांची देखील तातडीने दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. शाळेने उशिरा का होईना, परंतु सुरक्षा उपाययोजना सुरू केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु, या उपाययोजनांनी जे नुकसान झाले ते भरून निघणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला